कांहीं लोक चित्ताच्या समाधानासाठी नृत्य, गायन, वादनादि वा त्यांच्या उपलक्षणेने काव्य, कथा नाटकादि ललितकलांचा आश्रय घेतात. या कलांच्यामुळें कांहीं मनोरंजन होईल पण तेवढेच होईल. हे तात्पुरते बरें वाटणे म्हणजे कांहीं खरें समाधान नव्हे. या निरनिराळ्या कलांमध्ये चतुर असलेले ख्यातनाम कलावंतहि परस्परांविषयीच्या द्वेषमत्सरांनी भरलेले असतात आणि वैयक्तिक जीवनांत कामक्रोधांनीं व तज्जन्य नानाप्रकारच्या व्यसनांनी किडलेले राहतात. पुवाळलेल्या गंभीर व्रणावर केवळ बाहेरची मलमपट्टी जशी उपयोगी पडत नाहीं, तसेंच मनःस्वास्थ्याच्या प्रकरणी या ललितकलांचे होतें.