ज्याच्या अंतःकरणांत स्वार्थ नाहीं, अहंकार नाहीं, ज्याला कशाची अभिलाषा नाहीं, ज्याचें हवें-नको संपलेले असतें, त्याला क्षुब्ध होण्याचे कारणच नसतें. श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे जीवन त्या दृष्टीनें आदर्श आहे. समाजाने अनेक प्रकारचा छळवाद केला असूनहि ते कधी क्षुब्ध झाले नाहींत. चीड, संताप, भय, उद्वेग, यांपासून ते पूर्ण मुक्त होते. लोकांकडून इतकी गांजणूक सोसूनहि जनकल्याणाविषयीची त्यांच्या अंतःकरणांतील भावना कधी उणावली नाहीं. प्रेमळ आईच्या वात्सल्यानेंहि लाजावे, अशी जीवाआगळी माया त्यांनी लोकांच्यावर केली. जन्मदात्री माताहि इतके प्रेम करूं शकत नाहीं.