देहबुद्धि सोडल्यावांचून आपणांत सुधारणा होणार नाहीं. इंद्रियसुखांना सर्वस्व समजणाऱ्या देहात्मवादाचा, भौतिक प्रगति म्हणजेच सगळे कांहीं असें मानणाऱ्या जडवादी तत्त्वज्ञानाचा, त्याग केल्यावांचून जें हिताचे आहे, आपल्या स्वाधीन आहे, तें आपण जाणूं शकणार नाहीं. देहबुद्धीचा निषेध संतांनी ठायीं ठायीं केला आहे तो यासाठींच.