सत्संगतीचा लाभ होण्यासाठी केवळ यांत्रिक सहचर्य उपयोगी पडत नाहीं. साधकाच्या अंतःकरणांत, साधनेविषयी, सत्याच्या ज्ञानाविषयीं आणि ज्याच्या संगतींत राहावयाचे त्या सत्पुरुषाविषयी, सद्गुरुविषयी अनुराग असला पाहिजे. प्रेम असलें पाहिजे, भक्ति असली पाहिजे. तरच सत्याचा निश्चय करतां येईल किंवा बोध स्थिरावेल. अन्यथा अखंड पाण्यांत राहूनहि आतून कठिण व वरून कोरडा असलेल्या नर्मदेतल्या गोट्यासारखी त्याची स्थिति होईल.