कीर्तने-प्रवचने-व्याख्याने यांना श्रोत्यांच्या आवडीनुरूप आणि वक्त्याच्या कौशल्यानुरूप पुष्कळ माणसे जमतात, खूप दाटी होते. पण एवढेच होतें. वक्त्यानें काय सांगितलें म्हणून थोड्या वेळाने विचारले तर तें नीटपणे कुणी सांगू शकत नाहीं. थट्टा, विनोद गोष्ट क्वचित् लक्षांत राहते. वक्त्यानें हा आपल्याला टोमणा मारला आहे असें श्रोत्याला वाटलें तर तोहि लक्षांत राहतो. पण कोणत्या सिद्धांताच्या वा साधनेच्या संदर्भांत हें आलें आहे, तें कोणाच्या लक्षांत नसते. याचें खरें कारण असें कीं श्रवण हा काही लोकांचा मनोरंजनाचा, वेळ घालविण्याचा किंवा पुण्य लागते या कल्पनेचा विषय असतो. सिद्धांत समजून घेतले पाहिजेत आणि तद्नुसार साधना केली पाहिजे, या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्षच नसते. म्हणून त्या लक्षांत राहत नाहींत.
COPYRIGHT © 2026 श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित

