तत्त्वज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान हे कांहीं इतर पदार्थजाताच्या ज्ञानाप्रमाणें बाहेरून मिळणारे उपरे ज्ञान नाहीं. आत्मा काय, ब्रह्म काय किंवा ईश्वर काय, हे कुठे तरी बाहेर विशिष्ट स्थलीं, दूर अंतरावर आहेत असें नाहीं. शास्त्र सांगते – “तत्त्वमसि” तेंच तूं आहेस. ज्याला मी म्हणजे जीव समजतोस तो आत्मा म्हणजे ब्रह्मच आहे. भगवंत स्वतःच गीतेत सांगत आहेत कीं- “ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति।” (भ. १८|६१) ईश्वर हा प्रत्येक प्राणिमात्राच्या हृदयांत वास करतो.