ब्रह्म निर्गुण, निराकार आहे. इतर इंद्रियांच्यापेक्षां रूप या विषयाचें ग्रहण करणारे नेत्र हें इंद्रिय, हें अधिक व्यापक कार्यक्षेत्रांत प्रभावी ठरत असल्यानें त्याच्या विषयांत जें सत्य आहे तें इतरहि इंद्रियांना लागू पडण्यासारखे असल्यानें वर्ण हा विषय प्रधान मानून त्याचा ऊहापोह केला आहे. ब्रह्माला कोणताहि रंग नाहीं, तें पिवळे नाहीं, पांढरे नाहीं, सावळे नाहीं, निळे नाहीं आणि असें असल्यामुळें ते व्यक्त वा अव्यक्त कांहींच सांगता येत नाही, ते अनिर्वचनीय आहे.