अश्रद्ध तर्कट्यांचा बुद्धिवाद मोठा विलक्षण असतो. हें सगळे ब्रह्म आहे ना! सच्चिदानंद आहे ना! मग जगांत जडता कशी? दुःखे कां? भयानक विषमता कां आढळून येते? ब्रह्म जर सर्वव्यापक आहे तर शिल्पकार जिला पायाखाली धरून घडवितो त्या दगडाच्या मूर्तीला देव म्हणून वंदनीय का मानावयाचें? तिची पूजा कशाला करावयाची? ब्रह्म जर सर्वत्र ओतप्रोत भरून आहे तर पाप-पुण्याची कल्पना थोतांड नाही काय? पाप-पुण्याच्या कल्पनेवर आधारलेले विधिनिषेध जीवनाचे मार्गदर्शक म्हणून कशासाठी मानावयाचे? इ. इ. आक्षेप त्यांच्याकडून घेतले जातात. खरे म्हणजे अवस्थाक्रम लक्षांत न घेतल्याने हें असें अवास्तव तर्कट केलें जातात.