ॐ  श्री  卐

ll श्रीशंकर ll

प.पू.स्वामी वरदानंद भारती यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या “श्रीदासगणू” पुरस्काराचे यंदा २७ वे वर्ष असून धर्मकार्य, देशकार्य व संस्कृतीच्या संवर्धनासाठी उत्तम कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था यांना पाठबळ देण्यासाठी, त्यांनी घेतलेल्या निस्पृह कष्टाची, केलेल्या नि:स्वार्थ त्यागाची दखल घ्यावी व त्यांचे महनीय कार्य समाजापुढे यावे, या हेतूने श्रीदासगणू महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रीराधादामोदर प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या वर्षीचा हा पुरस्कार पुणे येथील “भारतीय विचार साधना” या संस्थेस प्रदान होणार आहे.

सदर “भारतीय विचार साधना” ही संस्था मागील ४० वर्षांपासून “राष्ट्रहित सर्वतोपरी” हे ब्रीदवाक्य घेऊन त्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीय विचारांचा प्रचार, प्रसार व्हावा म्हणून कार्य करीत आहे आणि त्या साठी विविध प्रकारच्या राष्ट्रीय/वैचारिक विषयांच्या ग्रंथांचे प्रकाशन करीत आहे. आत्तापर्यंत ५०० हुन अधिक पुस्तके प्रकाशित केली असून सध्या संस्थेकडे ३१५ शीर्षकांची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. संघ साहित्य, संघ प्रचारक चरित्रे, संस्कारक्षम कथामाला, देशभक्ती गीतमाला, खेळ, सूर्यनमस्कार, शाखा घेण्यासाठी साहायिकादि, मातृशक्ती, योग/आरोग्य विषयक, भारतीय दृष्टिकोनातून शिक्षण, विज्ञान व तंत्रज्ञान, सत्व जागरण, आदर्श चरित्रे, संघाच्या विविध गतिविधी, आयाम, हिंदुत्व, सांस्कृतिक ठेवा, आध्यात्मिक वारसा, इतिहास, स्वराज्य ७५, संस्कृत अशा जीवनमूल्ये वर्धित करणाऱ्या विषयांवर प्रथितयश व तज्ज्ञ लेखकांकडून पुस्तके लिहून घेऊन संस्थेने ती प्रकाशित केली आहेत.

शिष्यवृत्ती वा पाठ्यवृत्ती देऊन हुशार तरुण लेखकांकडून संशोधनात्मक लेखन करवून घेऊन या वाङ्मयात मोलाची भर घालण्याचे कामहि “भा.वि.सा.” करीत आहे. अन्य भाषांमधील चांगली पुस्तके राष्ट्रीय विचारांचे जागरण करण्यासाठी त्यांचे मराठी अनुवाद संस्थेने प्रकाशित केले आहेत. कालानुरूप नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करून ऑडिओ बुक, ई-बुक, ऑनलाइन ग्रंथविक्री यातहि संस्थेने आघाडी घेतली आहे.

राष्ट्रीय विचारांचा प्रचार, प्रसार व्हावा या हेतूने राष्ट्रीय विचारांचे जागरण करणाऱ्या अशा या संस्थेची यंदाच्या श्रीदासगणू पुरस्कारासाठी निवड करताना प्रतिष्ठानला विशेष आनंद होतो आहे. स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफल व रोख रक्कम रु. १,२५,०००/- असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सदर पुरस्कार प्रदानाचा समारंभ श्रीदासगणू महाराज यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजे कार्तिक वद्य त्रयोदशी अर्थात दि. २८/११/२०२४, गुरुवार, या दिवशी ‘दामोदराश्रम’, गोविंदपुरा, पंढरपूर, येथे संपन्न होणार आहे.

भारतीय विचार साधना या संस्थेचे मनःपूर्वक अभिनंदन.

याच दिवशी २०२४ च्या शालान्त परीक्षेत संस्कृत विषयात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाहि सत्कार होणार आहे.

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः। सर्वे सन्तु निरामयाः। सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः॥

आता पर्यंत ज्या मान्यवर व्यक्ती, संस्था यांना “श्रीदासगणू” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे त्यांची यादी पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Click Here.

“सर्वे सन्तु निरामयाः क्षितितलें भद्राणि पश्यन्तु च॥” 

 

ॐ  श्री  卐

ll श्रीशंकर ll

ॐ श्री 卐 ll श्रीशंकर ll ॐ श्री 卐

श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्र म्हणताना पाठात लक्ष ठेवण्याची क्लृप्ति जाणून घेण्यासाठी येथे click करा.