Calendar Day 1

एखादी गोष्ट साधण्यासाठी जें करावयाचें तेंच नेमके व योग्य रीतीनें केलें जावे आणि जें बोलले त्या शब्दांना धरून राहणारा, शब्द न पालटणारा – असें हे दोन्हीं गुण नेत्याच्या अंगी असणें आवश्यक आहे. त्यामुळें अनुयायांच्यावर पश्चाताप करण्याचा प्रसंग कधी येत नाही. हे गुण असले तरच पुढारी विश्वासार्ह ठरतो.

Calendar Day 2

‘विवेक’ शब्दावरून आणखीहि एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे. फार थोर व्यक्तींचे मोठेपण सामान्य मापाने मोजून चालत नाहीं. थोरांची चरित्रे वाचतांना असा मोह फार वेळां होतो. पुष्कळ वेळां भली माणसेंहि या मोहाला बळी पडतांना दिसतात. राज्यत्याग, शूर्पणखेची विटंबना करणें, सुवर्णमृगाच्या मागें लागणे, सीतेच्या विरहाने शोकाकुल होणें, वालीवध, सीतात्याग, शंबूक-दंडन, इत्यादि प्रसंग वस्तुतः रामचंद्रांच्या थोरवीचे अनेकानेक पैलू प्रगटविणारेच आहेत. पण हें नीट समजून घेतलें पाहिजेत, समजून घेताना विवेक केला पाहिजे.

Calendar Day 3

जेव्हां केव्हां बोलावयाचें, लिहावयाचे तेव्हां तें नीटपणे सर्व प्रकारचा साधक बाधक विचार करून, तज्ञांची मते चांगली पारखून, शास्त्रवचनें चांगली शोधून, थोरांच्या वाक्यांचा आधार घेऊन, मगच लिहावे वा बोलावे. लिहिण्यापेक्षां बोलणें कमी गंभीरपणाचें आहे, तेव्हां बोलतांना विशेष काळजी घेतली नाहीं तरी चालेल, असें समजूं नये. लिहिण्याइतकेंच बोलणेंहि महत्त्वाचे आहे, असेंच समजून वागले पाहिजे. खरें म्हणजे बोलणें हेंच महत्वाचे आहे. लिहिणें हा त्याचा आनुषंगिक पर्याय आहे.

Calendar Day 4

विचार करून, विचार घेऊन बोलले म्हणजे तें सत्याच्या अधिक जवळचे असतें आणि हितकारक ठरतें. दुर्दैवाने आजकाल विद्वान् म्हणणारी मंडळींहि त्याकडे दुर्लक्ष करतात.

Calendar Day 5

केवळ आधुनिक म्हणून जशी एखादी गोष्ट वाईट नसते, त्याप्रमाणेंच केवळ, परंपरेनें स्वीकारलेली म्हणूनहि एखादी गोष्ट असत्य नसते, त्याज्यहि नसते. पण हा विचार विद्वान लिहितां-बोलतांना करीत नाहींत. परंपरागत धारणांवर आघात करतांना त्यांना विलक्षण स्फुरण येतें, आणि त्या अभिनिवेशांत मग दुष्ट तर्काचा आणि असत्याचाहि पुरस्कार केला जातो. यामुळे वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातले अस्वास्थ्य तेवढे वाढते. वातावरण संतप्त राहून स्वतःच्या पोळ्या भाजून घेण्यासाठी तेंच कोणाला इष्ट वाटत असेल तर वेगळे. मात्र शांतता, स्वास्थ्य हवें असेल तर असें बोलतां कामा नये.

Calendar Day 6

विवंचूनि चालण्याचा, विवेकपूर्वक वागण्याचा, कृति करण्यापूर्वी पूर्णपणे सावध राहण्याचा संतांचा आदेश संतापशमनासाठीं आहे. ज्या गोष्टीचा पश्चाताप करावा लागेल असे माणसाच्या हातून काही घडता कामा नये.

Calendar Day 7

जो जो माणसाचे अधिकारपद उंच आणि कार्यक्षेत्र व्यापक, तो तो त्यानें सावध राहण्याची दक्षता अधिकाधिक घेतली पाहिजे. विचार करतांना साधकबाधक विचार करावयाचे असल्यानें अगदीं टोकावर जाऊन विचार केले तरी एकवेळ चालतात, पण वागतांना मात्र असे टोक गाठून चालत नाहीं. तेथे नेहमी मध्यमक्रमच अवलंबिला पाहिजे.

Calendar Day 8

व्रते-वैकल्यें, पूजा-पाठ, सोवळे-ओवळें, खाण्यापिण्यासंबंधीं नियम, कंजूषपणा वा उधळपट्टी, वेषभूषा, आदरातिथ्य, विषयसेवन या सर्व प्रकरणात माणसाने नेमस्तपणा धरावा. मध्यमक्रम अवलंबावा; मात्र मुळांत हें वागणे शुद्ध, निर्मळ, सदाचारी असावें. या दृष्टीने एक संस्कृत वचन मार्मिक आहे. “अनाचारस्तु मालिन्यम् अत्याचारस्तु मूर्खता । विचाराचारसंयोगः स सदाचार उच्यते ।” वर्षानुवर्ष न धुतलेली धाबळी वा कद हे जसें सोवळें नाही तसेच रस्त्याचीं पायतणें घालून घरांत हिंडणें ही सुधारणाहि नव्हे.

Calendar Day 9

शुद्ध, सात्त्विक राहता येत नाहीं, पण म्हणून तामस होऊं नये. वर्तनामध्यें सात्त्विकतेचे प्राधान्य राहील अशी दक्षता घ्यावी. ही शुद्धताहि आहे आणि नेमस्तताहि आहे. जीवनांत नेहमीच तोल राखून चालावे लागतें. तेच ‘नेमस्त’ या शब्दाने सुचविले आहे. ध्येय निश्चित असलें व पवित्र असलें कीं हा नेमस्तपणा शुद्ध ठरतो.

Calendar Day 10

हरिभक्त म्हणजे सत्पुरुष. हा विरक्त असतो, वैराग्ययुक्त असतो. त्याच्या अंतःकरणांत विषयसेवनाची आसक्ति लवमात्र नसते. तसेच तो ज्ञाननिधि असतो, ज्ञानाचा सागर असतो. त्याच्या जवळ ज्ञानविज्ञानांपैकीं आवश्यक तें सर्व पुरेपूर असतें.

Calendar Day 11

गीतेच्या तेराव्या अध्यायांत अमानित्व-अदंभित्वादि ज्ञानाची अठरा लक्षणें सांगितली आहेत. ही सर्व ज्याच्या ठिकाणी व्यक्त असतात तो ज्ञानराशी.

Calendar Day 12

ज्ञान होईल कदाचित, पण ते टिकले पाहिजे, तरच उपयोगाचे. आणि ज्ञानाचें टिकणें हें अंतःकरणाच्या शुद्धतेवर म्हणजेच विरक्तीवर, वैराग्यावर अवलंबून आहे.

Calendar Day 13

विरक्ती वा वैराग्य ही अंतःकरणाची स्थिति आहे. जवळच्या संग्रहावरून वा परिग्रहावरून त्यांचें स्वरूप वा प्रमाण ठरविता येणार नाहीं. जवळ कांहीं नसलेला एखादा अकिंचन भिकारी विरक्त नसेल. उलट ऐश्वर्याने संपन्न असलेला राजा जनक विरक्त होता. तेव्हा विरक्त हा शब्द आपण समजतो त्या वरवरच्या अर्थाने उपयोजिणे वास्तव ठरणार नाही. आपली मापे प्रामाणिक असतातच असें नाहीं. त्यामुळे एखादा माणूस कसा वागतो, कसा राहतो, काय नेसतो, काय खातो, एवढ्यावरून त्याचें खरे स्वरूप कळणार नाही.

Calendar Day 14

हरिभक्ताचे आणखी एक लक्षण म्हणजे त्याच्या मनातील निश्चय दृढ असतो. धरसोड, चंचलपणा, सरड्याच्या रंगाप्रमाणे पालटणारें विचार असें त्याच्याजवळ नसतात.

Calendar Day 15

हरिभक्ताच्या संगतीत माणसाला बरें वाटतें. त्याची भेट झाली, त्यानें पाहिले, दोन वाक्ये तो बोलला, त्यानें प्रेमळ हाताने कुरवाळले, त्याच्या वरदहस्ताचा थोडासा स्पर्श मस्तकाला झाला, तरी माणसाचा संताप, खेद नाहीसा होतो, मन शांत होतें, वृत्तींना प्रसन्नता लाभते. अशा थोर हरिभक्ताने चार वाक्ये जरी उच्चारली तरी माणसाच्या अंतःकरणांतील नाना प्रकारचे संदेह दूर होतात, श्रद्धा बळावते, बुद्धि स्थिरावते. मात्र यासाठीं हरिभक्ताच्या संगतीत जाणाऱ्याचे मन सरळ असलें पाहिजे, प्रांजळ असलें पाहिजे, तो विनयी असला पाहिजे, अहंकारी असतां कामा नये. नाहीतर पाण्यात अखंड भिजूनहि सुसरीच्या पाठीला मऊपणा जसा येत नाहीं, ती तशीच कठोर, खडबडीत राहते, तसेंच याचेंहि व्हावयाचें.

Calendar Day 16

योगी आढळावा, सत्पुरुष भेटावा, असें बहुतेकांना वाटते. आपण आपल्या मापाने कोणाकोणाला योगी, सत्पुरुष, महाराज, भगवान् ठरवितो? लोकविलक्षण वेषभूषा, वाढलेला दाढीजटा, गंधांचे टिळे, माळांचे वेढे, कीर्तन प्रवचनांतील रंगढंग, मोठा वैभवी मठ, हजारोंची जेवणावळ असलेले उत्सव महोत्सव, मनांतले ओळखणे, भूतभविष्य सांगणे, रोग घालविणे, अद्भुत रीतीनें भस्म, कुंकू, प्रसाद काढून देणे, संततिसंपत्तीची इच्छा पूर्ण करणें, संकटांतून सोडविणे इत्यादि इत्यादि पाहून आपण साधू ठरवितो. हें रत्नाचा तोल करतांना वखारींतला कांटा वापरण्यासारखे आहे. तथापि या गोष्टी कोणाजवळ असतील तर त्याला फार तर तंत्रज्ञ समजावे. कामापुरता त्याचा उपयोगहि पाहिजे तर करून घ्यावा. त्या धंदेवाईकाचें कांहीं शुल्क असेल तर तेहि द्यावे. काम झालें तर सौजन्याने त्याचे आभारहि मानावेत, पण त्याला कोणी साधु, महात्मा, योगी समजून त्याचेपुढे “घालीन लोटांगण वंदीन चरण” असे करूं नये.

Calendar Day 17

बाह्यरंगावरून साधू वाटणारी माणसे बहुधा स्वार्थसाधू असतात, परमार्थाची अधिकारी नसतात. खऱ्या साधूची ओळख आपणाला पटणे कठिण आहे. बहुधा आपली फसगतच होते. “योगियांच्या खुणा योगी जाणें” असें म्हणतात ते यासाठींच.

Calendar Day 18

निरहंकारी असणें हें सत्पुरुषाचे पहिलें लक्षण. आपल्या योग्यतेची, मोठेपणाची, आपल्या अंगीचा सामर्थ्याची, सद्गुणाची त्याला जाणीव नसते. आपली थोरवी, आपली योग्यता, इतरांच्या लक्षांत आणून देण्यासाठी तो प्रयत्न करीत नाहीं, हस्ते-परहस्ते स्वतःची ख्याति वाढवीत नाहीं, भवती स्तुतिपाठकांचा मेळा जमवीत नाहीं. आपला मानसन्मान व्हावा असें त्याला वाटत नाहीं. त्याला सत्काराची अपेक्षा नसते. स्तुतीने तो खुलत नाही, चढत नाही, कारण या सर्व गोष्टी अहंकाराच्या पोटीं जन्माला येतात, आणि साधूजवळ अहंकार नसतोच. अहंकाराचा स्पर्शच ज्याला नाहीं, त्याच्याजवळ ताठा, दर्प, मद, गर्व, ही अहंकाराची अवस्थांतरें असण्याची शक्यताच नाहीं.

Calendar Day 19

वीतराग म्हणजे आसक्तीच्या पार गेलेला. निरहंकारी मनुष्य स्वभावतःच अनासक्त असतो. ज्याचें ‘मी’ सुटले त्याच्याजवळ ‘माझें’ म्हणून कांहीं उरतच नाहीं. त्याला विषयोपभोगांची अभिलाषाच नसते. खाणे, पिणे, लेणे, राहणे यासाठीं अमुकच पाहिजे, इतकेंच पाहिजे, असा त्याचा आग्रह नसतो. ऐश्वर्याची, वैभवाची, संपत्तीची कामना तो करीत नाहीं.

Calendar Day 20

साधु हा उपभोग घेतो पण क्षमेचा आणि शांतीचा. त्यामुळें निंदा, अवहेलना, अपमान, तिरस्कार, उपेक्षा कितीहि जरी झाली, नाना प्रकारची संकटे कोसळली, आपत्ती आल्या, तरी त्याची चित्तवृत्ति निवांत जागी तेवणाऱ्या नंदादीपाप्रमाणें प्रसन्न आणि शांत असते. तो क्षमाशील असतो, सहनशील असतो. पण तो अगतिक नसतो, दुर्बल नसतो. लाचार, दुबळा माणूस निरुपायानें सहन करतो, पण त्याचे मन चरफडत असतें. याचें मन शांत असतें, आणि त्यामुळें क्षमाशीलता त्याला उपभोगाचे सुख देते.

Calendar Day 21

क्षमा, शांति हे वैयक्तिक सद्गुण आहेत. व्यक्तिजीवनाचें ते आदर्श आहेत, हा व्यष्टिधर्म आहे. आपण हिंदू माणसे मात्र नेमके उलटे वागतो. सामाजिक पातळीवर, राष्ट्राच्या पातळीवर आपण सोशिक, शांत, उदार आहोत. हिंदू म्हणून आमच्यावर अनेक आपत्ती आल्या, आमचे न्याय्य अधिकारहि लुबाडले गेले, आमच्या देशाची छकलें उडाली, स्वार्थी उन्मत्तांनीं क्रूरपणें आपला लाभ करून घेतला, आणि तरी आम्हीं शांतच राहिलों. वैयक्तिक पातळीवर मात्र आमचा मत्सर जागृत असतो. आम्ही सूडबुद्धीने वागतो. बांधाच्यामुळे गेलेल्या वीतभर जागेसाठी न्यायालयांत भांडत बसतो. संत असे असत नाहींत. ते वैयक्तिक लाभहानीचा विचार करीत नाहींत. आणि म्हणूनच ते शांत आणि क्षमाशील राहण्यात आनंद अनुभवू शकतात. अगतिकपणे तडफडणारे स्वार्थी मन हें सुख मिळवू शकत नाहीं.

Calendar Day 22

दयाशीलता आणि अखंड दक्षता हीच सत्पुरुषाची योगसाधना असते. नाना प्रकारच्या आपत्तींनी रंजले गांजलेले लोक विषयसुखालाच सर्वस्व मानून त्यांत रंगलेले पामर, यांच्याविषयी सत्पुरुषांच्या अंतःकरणांत दया असते. उन्हाळ्यामध्ये तहानेने तडफडणारे गाढव पाहून श्रीएकनाथ महाराजांचे अंतःकरण द्रवले आणि त्यांनी काशीहून रामेश्वराला घालण्यासाठी वाहून आणलेली, गंगेची कावड त्या दीन मुक्या प्राण्याच्या मुखांत ओतली. आपल्या हातून हें घडले नसतें. सत्पुरुषांच्या अंतःकरणांतील दया ही पूर्णपणे निरपेक्ष आणि व्यापक असते. आपत्तीत सांपडलेल्या आप्तांविषयीं आपणाला जें वाटेल तें संतांना सर्व भूतमात्राविषयी वाटत असते.

Calendar Day 23

सत्पुरुष दक्ष असतो. आवश्यक गोष्टी तो वेळच्यावेळी, योग्य रीतीने करणारच. मनुष्याचे जीवन हा एक प्रवास आहे आणि प्रवाशाने दक्ष राहिलेंच पाहिजे, नाहीतर तो लुटला जाईल, जायचे तिथे तो योग्य रीतीनें पोचणार नाहीं. वेंधळेपणा, गबाळेपणा, दीर्घसूत्रीपणा हा कांहीं सद्गुण नाहीं आणि सत्पुरुष आतून तरी तसा कधींच नसतो.

Calendar Day 24

आळशी माणसाने आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठीं परमार्थाची ढाल वापरावी आणि ईश्वराची इच्छा असेल तसें होईल म्हणावे, हा लुच्चेपणा आहे. आम्हीं चित्रपटाचें, नाटकाचे आसन लांब ओळीत उभे राहून आधीं आरक्षित करणार, नुसता खेळ पाहण्यासाठी लांबचा प्रवास करणार; आणि यात्रेला कां गेला नाहींस असें म्हटलें तर ईश्वराची इच्छा असेल तेव्हां घडेल असें सांगणार, ही लबाडी आहे.

Calendar Day 25

सत्पुरूष कर्तव्याला ओझे मानीत नाहीं. शारीरिक कष्टाला कंटाळत नाहीं. श्रमाने कधीं वैतागत नाहीं. विहितकर्म तो कधीं टाळीत नाहीं. तो परमार्थासाठी सर्वदा दक्ष असतो.

Calendar Day 26

सत्पुरुष निर्लोभी असतो. वीतरागतेचे, वैराग्याचे, हे दृश्य रूप आहे. ज्याच्या अंतःकरणांत अनासक्ति नांदते, त्याचे ठिकाणी लोभ संभवतच नाहीं. उपाधि तो वाढवीत नाही. संग्रहाची त्याला हौस नसते. जो वीतराग आहे, निर्लोभी आहे, तो स्वाभाविकपणेच निश्चिंत असतो. त्यामुळे त्याचे ठिकाणीं कोणत्याहि प्रकारचा क्षोभ नसतो. ज्याला कशाची फिकिर नाहीं तो फकीर. संत खऱ्या अर्थाने असा असतो.

Calendar Day 27

ज्याच्या अंतःकरणांत स्वार्थ नाहीं, अहंकार नाहीं, ज्याला कशाची अभिलाषा नाहीं, ज्याचें हवें-नको संपलेले असतें, त्याला क्षुब्ध होण्याचे कारणच नसतें. श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे जीवन त्या दृष्टीनें आदर्श आहे. समाजाने अनेक प्रकारचा छळवाद केला असूनहि ते कधी क्षुब्ध झाले नाहींत. चीड, संताप, भय, उद्वेग, यांपासून ते पूर्ण मुक्त होते. लोकांकडून इतकी गांजणूक सोसूनहि जनकल्याणाविषयीची त्यांच्या अंतःकरणांतील भावना कधी उणावली नाहीं. प्रेमळ आईच्या वात्सल्यानेंहि लाजावे, अशी जीवाआगळी माया त्यांनी लोकांच्यावर केली. जन्मदात्री माताहि इतके प्रेम करूं शकत नाहीं.

Calendar Day 28

थोडा प्रकृतिभेद असला तरी सर्व संत शांत-प्रसन्न असेच असतात. आपण मात्र एवढ्या तेवढ्या कारणांनी भडकून उठतो. अगदी फुसक्या निमित्तानेंहि आम्हीं अस्वस्थ होतों. आमचा संताप अनावर होतो. सूडाच्या भावनेनेंहि आम्ही पेटतो. आमच्या तोंडांतून अपशब्दांची बरसात झडते. आणि संत अत्यंत प्रतिकूल परिस्थितींतहि शांत-प्रसन्न राहतात. परमेश्वराचें ‘अक्षोभ्य’ हे नांव त्यांनाहि पूर्णपणे शोभते.

Calendar Day 29

संताच्या ठिकाणची दया ही क्षमा, शांति या सत्त्वगुणाचा परिणाम असते. त्यात अगतिकता नाहीं, लाचारी नाहीं, दैन्य नाहीं. तो अल्पसंतुष्ट असतो. अयाचितवृत्तीनें राहील, कदाचित् भिक्षा मागेल, पण तो दीनवाणा भिकारी नाहीं. उलट आत्मतृप्त असल्यानें ईश्वरी प्रेमांत रंगून गेल्यामुळे परमेश्वरावरील दृढ विश्वासाने, संतांच्या ठिकाणीं कांहीं वेगळ्या प्रकारची मस्तीच पुष्कळवेळा दिसून येते. आत्मानंदांत ते धुंद असतात. जगाचे पाश त्यांना खेचू शकत नाहींत.

Calendar Day 30

संत दीन असत नाहींत, ते बापुडवाणे नाहींत. कारण त्यांच्याजवळ कोणत्याहि दृष्टीनें परस्वाधीनता नसतें, ते पूर्णपणे स्वतंत्र असतात. कोणावरहि त्यांचें जीवन अवलंबून नसते. त्यांच्या संबंधांत जें कांहीं घडत असते तें सर्व भगवंताच्या प्रेरणेने होत असतें आणि म्हणून समर्थ स्वतःच एके ठिकाणीं “आम्ही काय कुणाचे खातो रे। तो राम आम्हांला देतो रे॥” असें म्हणतात. हा डौल सामान्य नाहीं.

Calendar Day 31

कामनाच नको, कल्पनाच नको, असें संत म्हणत नाहींत. पण कामनेला आसक्तीचे स्वरूप येऊ नये, कामनेने चैनीलाच गरज मानूं नये, असें त्यांना सांगावयाचें आहे. म्हणून वावग्या कल्पना नसाव्या, विकृत कल्पना करूं नये, विचारांना भरकटू देऊं नये, असें संतांचे सांगणे आहे.