Calendar Day 1

एखादी गोष्ट साधण्यासाठी जें करावयाचें तेंच नेमके व योग्य रीतीनें केलें जावे आणि जें बोलले त्या शब्दांना धरून राहणारा, शब्द न पालटणारा – असें हे दोन्हीं गुण नेत्याच्या अंगी असणें आवश्यक आहे. त्यामुळें अनुयायांच्यावर पश्चाताप करण्याचा प्रसंग कधी येत नाही. हे गुण असले तरच पुढारी विश्वासार्ह ठरतो.

Calendar Day 2

‘विवेक’ शब्दावरून आणखीहि एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे. फार थोर व्यक्तींचे मोठेपण सामान्य मापाने मोजून चालत नाहीं. थोरांची चरित्रे वाचतांना असा मोह फार वेळां होतो. पुष्कळ वेळां भली माणसेंहि या मोहाला बळी पडतांना दिसतात. राज्यत्याग, शूर्पणखेची विटंबना करणें, सुवर्णमृगाच्या मागें लागणे, सीतेच्या विरहाने शोकाकुल होणें, वालीवध, सीतात्याग, शंबूक-दंडन, इत्यादि प्रसंग वस्तुतः रामचंद्रांच्या थोरवीचे अनेकानेक पैलू प्रगटविणारेच आहेत. पण हें नीट समजून घेतलें पाहिजेत, समजून घेताना विवेक केला पाहिजे.

Calendar Day 3

जेव्हां केव्हां बोलावयाचें, लिहावयाचे तेव्हां तें नीटपणे सर्व प्रकारचा साधक बाधक विचार करून, तज्ञांची मते चांगली पारखून, शास्त्रवचनें चांगली शोधून, थोरांच्या वाक्यांचा आधार घेऊन, मगच लिहावे वा बोलावे. लिहिण्यापेक्षां बोलणें कमी गंभीरपणाचें आहे, तेव्हां बोलतांना विशेष काळजी घेतली नाहीं तरी चालेल, असें समजूं नये. लिहिण्याइतकेंच बोलणेंहि महत्त्वाचे आहे, असेंच समजून वागले पाहिजे. खरें म्हणजे बोलणें हेंच महत्वाचे आहे. लिहिणें हा त्याचा आनुषंगिक पर्याय आहे.

Calendar Day 4

विचार करून, विचार घेऊन बोलले म्हणजे तें सत्याच्या अधिक जवळचे असतें आणि हितकारक ठरतें. दुर्दैवाने आजकाल विद्वान् म्हणणारी मंडळींहि त्याकडे दुर्लक्ष करतात.

Calendar Day 5

केवळ आधुनिक म्हणून जशी एखादी गोष्ट वाईट नसते, त्याप्रमाणेंच केवळ, परंपरेनें स्वीकारलेली म्हणूनहि एखादी गोष्ट असत्य नसते, त्याज्यहि नसते. पण हा विचार विद्वान लिहितां-बोलतांना करीत नाहींत. परंपरागत धारणांवर आघात करतांना त्यांना विलक्षण स्फुरण येतें, आणि त्या अभिनिवेशांत मग दुष्ट तर्काचा आणि असत्याचाहि पुरस्कार केला जातो. यामुळे वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातले अस्वास्थ्य तेवढे वाढते. वातावरण संतप्त राहून स्वतःच्या पोळ्या भाजून घेण्यासाठी तेंच कोणाला इष्ट वाटत असेल तर वेगळे. मात्र शांतता, स्वास्थ्य हवें असेल तर असें बोलतां कामा नये.

Calendar Day 6

विवंचूनि चालण्याचा, विवेकपूर्वक वागण्याचा, कृति करण्यापूर्वी पूर्णपणे सावध राहण्याचा संतांचा आदेश संतापशमनासाठीं आहे. ज्या गोष्टीचा पश्चाताप करावा लागेल असे माणसाच्या हातून काही घडता कामा नये.

Calendar Day 7

जो जो माणसाचे अधिकारपद उंच आणि कार्यक्षेत्र व्यापक, तो तो त्यानें सावध राहण्याची दक्षता अधिकाधिक घेतली पाहिजे. विचार करतांना साधकबाधक विचार करावयाचे असल्यानें अगदीं टोकावर जाऊन विचार केले तरी एकवेळ चालतात, पण वागतांना मात्र असे टोक गाठून चालत नाहीं. तेथे नेहमी मध्यमक्रमच अवलंबिला पाहिजे.

Calendar Day 8

व्रते-वैकल्यें, पूजा-पाठ, सोवळे-ओवळें, खाण्यापिण्यासंबंधीं नियम, कंजूषपणा वा उधळपट्टी, वेषभूषा, आदरातिथ्य, विषयसेवन या सर्व प्रकरणात माणसाने नेमस्तपणा धरावा. मध्यमक्रम अवलंबावा; मात्र मुळांत हें वागणे शुद्ध, निर्मळ, सदाचारी असावें. या दृष्टीने एक संस्कृत वचन मार्मिक आहे. “अनाचारस्तु मालिन्यम् अत्याचारस्तु मूर्खता । विचाराचारसंयोगः स सदाचार उच्यते ।” वर्षानुवर्ष न धुतलेली धाबळी वा कद हे जसें सोवळें नाही तसेच रस्त्याचीं पायतणें घालून घरांत हिंडणें ही सुधारणाहि नव्हे.

Calendar Day 9

शुद्ध, सात्त्विक राहता येत नाहीं, पण म्हणून तामस होऊं नये. वर्तनामध्यें सात्त्विकतेचे प्राधान्य राहील अशी दक्षता घ्यावी. ही शुद्धताहि आहे आणि नेमस्तताहि आहे. जीवनांत नेहमीच तोल राखून चालावे लागतें. तेच ‘नेमस्त’ या शब्दाने सुचविले आहे. ध्येय निश्चित असलें व पवित्र असलें कीं हा नेमस्तपणा शुद्ध ठरतो.

Calendar Day 10

हरिभक्त म्हणजे सत्पुरुष. हा विरक्त असतो, वैराग्ययुक्त असतो. त्याच्या अंतःकरणांत विषयसेवनाची आसक्ति लवमात्र नसते. तसेच तो ज्ञाननिधि असतो, ज्ञानाचा सागर असतो. त्याच्या जवळ ज्ञानविज्ञानांपैकीं आवश्यक तें सर्व पुरेपूर असतें.

Calendar Day 11

गीतेच्या तेराव्या अध्यायांत अमानित्व-अदंभित्वादि ज्ञानाची अठरा लक्षणें सांगितली आहेत. ही सर्व ज्याच्या ठिकाणी व्यक्त असतात तो ज्ञानराशी.

Calendar Day 12

ज्ञान होईल कदाचित, पण ते टिकले पाहिजे, तरच उपयोगाचे. आणि ज्ञानाचें टिकणें हें अंतःकरणाच्या शुद्धतेवर म्हणजेच विरक्तीवर, वैराग्यावर अवलंबून आहे.

Calendar Day 13

विरक्ती वा वैराग्य ही अंतःकरणाची स्थिति आहे. जवळच्या संग्रहावरून वा परिग्रहावरून त्यांचें स्वरूप वा प्रमाण ठरविता येणार नाहीं. जवळ कांहीं नसलेला एखादा अकिंचन भिकारी विरक्त नसेल. उलट ऐश्वर्याने संपन्न असलेला राजा जनक विरक्त होता. तेव्हा विरक्त हा शब्द आपण समजतो त्या वरवरच्या अर्थाने उपयोजिणे वास्तव ठरणार नाही. आपली मापे प्रामाणिक असतातच असें नाहीं. त्यामुळे एखादा माणूस कसा वागतो, कसा राहतो, काय नेसतो, काय खातो, एवढ्यावरून त्याचें खरे स्वरूप कळणार नाही.

Calendar Day 14

हरिभक्ताचे आणखी एक लक्षण म्हणजे त्याच्या मनातील निश्चय दृढ असतो. धरसोड, चंचलपणा, सरड्याच्या रंगाप्रमाणे पालटणारें विचार असें त्याच्याजवळ नसतात.

Calendar Day 15

सुधारण्यासाठींहि, सुधारणे हें चांगलें आहे, आवश्यक आहे आणि तसें झालेंच पाहिजे अशी मनुष्याची प्राथमिक धारणा तरी असावी लागते. हाच मनाचा सज्जनपणा. तसे झाले म्हणजे मग तें मन सज्जनांच्या संगतीने, तेथील पवित्र सात्त्विक वातावरणांत शुद्ध होतें, उन्नत होतें.

Calendar Day 16

मंदिर मोठे आहे, शांत आहे, स्वच्छ आहे, सुंदर आहे, मूर्ती आकर्षक आहेत, शृंगारलेल्या आहेत, पुजारी भाविकपणें पूजाअर्चा नीटनेटकी आणि शास्त्रशुद्ध रीतीनें करतो आहे. या सर्व वातावरणाचा माणसाच्या मनावर चांगला परिणाम घडतो. पण गर्दीत खिसे कापावयास मिळतील याच भावनेने जो तिथे जातो त्या चोराला मंदिराचे पावित्र्य काय उपयोगी पडणार? म्हणून संतांच्या संगतीचा लाभ व्हावा यासाठीहि मनाला सज्जनतेचा कांहीं स्पर्श असलाच पाहिजे.

Calendar Day 17

सज्जनांच्या संगतींत राहण्याचा खरा लाभ, परमार्थाच्या दृष्टीनें बुद्धींत इष्ट तो पालट होणें, हा आहे. कारण बुद्धि ज्या रीतीनें विचार करते त्याच रीतीने माणसाची प्रगति-परागति, उन्नति वा अधोगति होत असते.

Calendar Day 18

ईश्वराने माणसाला बुद्धि दिली, विचार करण्याचें सामर्थ्य दिले, घटनेमागील कारणें शोधून काढण्याची जिज्ञासा दिली, बुद्धीला स्वातंत्र्य दिलें, आणि हवें तसें वागण्यासाठी माणसाला मोकळे सोडले. माणसाने मात्र या इतक्या चांगल्या संधीचा फारसा सदुपयोग करून घेतला नाही. विषयोपभोगांतील आवश्यकतेचें भान न ठेवता तो सुखाला लालचावला, विषयाधीन झाला आणि मग क्रमाक्रमानें शरीर-मन-बुद्धि यांनाहि अनिष्ट वळण लागलें, शरीर सुखासीन झालें, मन विषयाच्या ओढीने चंचल बनलें, आणि भाड्यानें घेतलेल्या विद्वानाप्रमाणे बुद्धीहि शरीर-मनाला अनुकूल असेच निर्णय देऊं लागली. याचीच सवय लागली, व्यसन जडले आणि जन्मजन्मांतरीच्या या दीर्घकालीन संस्कारानें तेंच योग्य आहे असेंहि वाटूं लागलें. प्रत्यक्षांत वेगळेच घडत होतें, अनुभव चांगला नव्हता, पण तरी त्याची मीमांसा मात्र योग्य रीतीनें करतां येत नव्हती. बुद्धीचा श्रम दूर व्हावा असें वातावरणच नव्हतें. तें मिळावे म्हणून संतांनी सज्जनांच्या संगतींत आदराने रहा, त्यामुळें अगदीं दुर्जन असला तरीहि त्याची बुद्धि पालटते, कुबुद्धीची सुबुद्धि होते, चांगले आणि वाईट नेमके कळू लागतें, चांगलें स्वीकारले पाहिजे हें कळू लागतें असा उपदेश केला आहे.

Calendar Day 19

मनुष्याच्या सन्मार्गांत एक अडथळा आहे, तो म्हणजे रतिपति मदनाचा, कामाचा, विषयासक्तीचा. हा काम दुष्ट, दुरात्मा आहे, नष्ट चांडाल आहे, घातक-फसवा आहे. अनेक प्रकारची प्रलोभने तो निर्माण करतो. सुखालाच हित भासवतो. असत्यालाच सत्याचे पुट देऊन माणसाची वंचना करतो. या कामाने जर बुद्धि प्रभावित झाली तर स्वैराचाराची तत्त्वज्ञानें निर्माण होतात, आणि मग माणसाचे काय होईल, समाज कुठे जाईल तें सांगणें कठिण होतें. एऱ्हवी बरी वागणारी निरुपद्रवीं माणसेंहि, अस्वास्थ्य आणि संघर्षाची बळी ठरतात. अनन्वित संकटे त्यांच्या वांट्याला येतात. दुःखांतून, दैन्यांतून कोणाचीच सुटका होत नाहीं. दुःखाचा विसर पडण्यासाठी माणसे व्यसनाधीन होतात आणि मग अधःपाताला सीमा रहात नाहीं. विषयासक्तीला आवर न घातल्याचे हे परिणाम आहेत. कामाला नष्ट म्हटलें आहे ते यासाठींच.

Calendar Day 20

दुरात्मा, नष्ट अशा कामाच्या अतिरिक्त आसक्तीच्या तावडीतून सुटण्याचा मार्ग एकच आहे आणि तो म्हणजे मनाच्या अतीत होऊन राहणे. मनाच्या अतीत होणें म्हणजे कोणत्याहि वृत्ती मनांत उठणार नाहींत अशी स्थिति होणें. सर्व स्थितींत सर्व प्रकारचे हवें-नको संपले पाहिजे. मन पूर्णपणे निर्विकार झालें पाहिजे.

Calendar Day 21

मनानें कोणत्याहि रीतीचा संकल्प करूं नये. अनावश्यक असे कोणतेहि विचार मनांत येऊ देऊं नयेत. भोवती अनेक प्रकारच्या घटना घडत असतात. या सर्व गोष्टींचा आपणांशी किती संबंध असतो? तरी यासंबंधींचे विचार उगीचच मनामध्ये घोळत राहतात. भोवती घडणाऱ्या प्रत्यक्ष घटनांच्या सुखदुःखाचाहि माणसाने विचार करूं नये. त्यापासून अलिप्त राहावें असें शास्त्र सांगते.

Calendar Day 22

मन अगदीं रिकामे राहणे फार कठिण आहे. त्याला जर कांहीं चांगला उद्योग लावून दिला नाहीं, तर तें जणू पिशाच्चाच्या स्वाधीन होतें म्हणून मनानें सत्यसंकल्प करावा. चांगले विचार करावेत, चांगल्या संबंधी विचार करावेत. ईश्वराच्या लीलांचे, संतांच्या चरित्रांचे स्मरण करावें. सदुपदेशांचे चिंतन करावें. तत्त्वज्ञानाचा विचार करावा. सन्मार्गाचा शोध घ्यावा. साधना बळावेल असें पहावे. ब्रह्मासंबंधीचे ज्ञान तेंच शाश्वत सत्य; सर्वदा त्याच अनुसंधानांत असावे.

Calendar Day 23

आहे त्यापेक्षा कांहीं वेगळे मनांत येणे हा विकल्प. अनुकूल घडावे असें वाटत राहणे हा संकल्प. मन घड्याळाच्या लंबकाप्रमाणें या संकल्प-विकल्पांत हेलपाटत राहते.

Calendar Day 24

विकल्पांमुळेंच अगदीं जवळच्या नातेवाईकांत व मित्रांमित्रांतहि वितुष्ट येतें. दुसऱ्या विषयी झालेले अपसमज चार चौघांत बोलून दाखविण्याचीहि माणसाला फार घाई होते. निदान असें बोलणें तरी माणसाने टाळावे. फारच बोचले असेल तर प्रत्यक्ष त्या व्यक्तिलाच विचारून निराकरण करून घ्यावें. पण कोणाच्या पाठीमागे त्याच्याविषयी कोणत्याही प्रकारची निंदा करणें माणसाने टाळावे. या अशा निंदेमुळे विकल्प करण्याची प्रवृत्ति अधिकाधिक बळावते, ते टाळावे.

Calendar Day 25

मन निर्विकार व्हावें, मनामध्ये नेहमी चांगलेच विचार यावेत. विकल्पाची शक्यता उणी होत जावी, यासाठींचा उपाय म्हणजे – एकांतांत जाऊन ईश्वराचें भजन करावे. मन निर्विकार होत नाही आणि रिकामे मन पिशाच्चाचे क्रीडांगण होतें. ईश्वरी भजन हा त्यावरचा उत्तम उपाय. मन कोणत्या ना कोणत्या प्रकाराने ईश्वरी भजनांत गुंतले तर संकल्प-विकल्पाची गडबड शांत होऊं शकते.

Calendar Day 26

मन पूर्ण रिकामे, पूर्ण निर्विकार होईल तर मनाचे मनपणच जाईल, मन अमन होईल; उन्मनी अवस्था प्राप्त होईल. पण हे सोपे नाहीं. अनेक विषयांची आसक्ति असलेल्या मनाला अमन तर काय पण एकाग्र करणेंहि कठिण आहे. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेत कोणतीहि वस्तु अधर ठेवता येत नाहीं, मात्र फार दूर अंतराळांत वस्तु तशी राहूं शकते म्हणतात. पुण्याच्या कक्षेत मात्र वस्तु टांगून ठेवायची झाल्यास खुंटी हवी असते. मन संकल्प-विकल्प करते ते विषयाच्या ओढीने. ईशभजनाच्या खुंटीला तें यासाठी अडकवून ठेवले पाहिजे.

Calendar Day 27

जेव्हां जेव्हां एकांत मिळेल तेव्हां तेव्हां ईशस्मरण करावें किंवा शक्यतो एकांतांत जाऊन ईशस्मरण करावे. एकांतामध्यें एकाग्रता वाढण्यास मदत होते. विषय प्रत्यक्ष समोर नसल्यामुळें इंद्रिये शांत राहतात. स्वाभाविक मनहि मोकळे राहू शकते.

Calendar Day 28

वास्तविक एकांताचा विचार थोडा दूर ठेवला तरी, एका गोष्टीचा आपल्यापैकी बहुतेकांना चांगला अनुभव असेल. आपण तीर्थयात्रा उत्सव-महोत्सव याला जातो. घरचे नित्याचे व्याप त्यावेळीं भवती नसतात, त्यामुळे तेथील कार्यक्रमांत मन अधिक रमते, बरें वाटतें. काहीं लोक कौतुकाने म्हणतात कीं घरची आठवणसुद्धा इतके दिवस झाली नाहीं. हें कांहींसे खरेहि असते. कारण घराच्या दृष्टीने हा एकांतच मिळालेला असतो. एकांत जो जो सर्वांगीण होत जाईल तो तो मनाची एकाग्रता वाढत जाईल आणि तें भजनांत रमू लागेल.

Calendar Day 29

साधकाने सुखासाठी अरण्यांत जावे. त्याचाहि उद्देश एकांत मिळावा हाच आहे. पण घरांत कुणी नसलें कीं घर खायला उठते अशी ज्यांची वृत्ती आहे, त्यांना पूर्ण एकांताचा लाभ होण्याची शक्यता नसते. त्यांनी क्रमाक्रमानेंच एकांतवासाची संवय लावून घेतली पाहिजे.

Calendar Day 30

वैयक्तिक पातळीवर सोशिकपणा सद्गुण असला तरी राष्ट्रीय पातळीवर सोशिकपणा हा दुर्गुण आहे. राष्ट्रावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार सर्व शक्तीनिशी उग्रपणानें केला पाहिजे. त्या दृष्टीनें आक्रमण हेंच खरे संरक्षण आहे.

Calendar Day 31

आर्ततेने आळवल्यावरहि भगवंताने मौन धारण केले असेल तर तो परीक्षा पाहतो आहे असें समजावे. पण भूमिका प्रामाणिक असेल तर दुर्लक्ष होते हे भय बाळगण्याचें कारण नाहीं. देव आपल्या भक्ताची कधीं उपेक्षा करीत नाहीं असा दृढ विश्वास साधकाने बाळगावा.