विश्वास हाच कुठेहि कार्याचा प्रेरक असतो. अंतःकरणांत विश्वास नसता तर शास्त्रज्ञांनीं प्रयोग केलेच नसते. पुन्हा पुन्हा अपयश येऊनहि नवीन नवीन प्रयोग करावेसे वाटतात, ते विश्वासाच्या बळावरच. साधना अशीच करावयाची असते. तिचें मार्गदर्शन शास्त्र, संत, सद्गुरु करीत असतात. त्यांच्यावर भरंवसणें आणि उपासना करीत राहणे हाच अनंत, निस्सीम अशा सत्याला, सर्वव्यापक अशा ब्रह्माला शोधण्याचा मार्ग आहे.