ॐ श्री 卐
ll श्रीशंकर ll
(७) दि.०१/०२/२०१९, शुक्रवार = म्हसवड ते गोंदवले, ता. माण.
अंतर २१ किमी / मुक्काम : भक्तनिवास, श्रीगोंदवलेकर महाराज संस्थान, गोंदवले.
जयाचा जगी जन्म नामार्थ झाला l जयाने सदा वास नामात केला l
जयाने सदा गायिली नाम कीर्ती l नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती ll
खरेच थंडी पडतेय का ? असा प्रश्न सकाळी उठून मंडळी आवरत असताना पडायचा. आपापले प्रातर्विधी, आन्हिकं, जपजाप्य इत्यादी साधना पूर्ण करून मंडळी ०५३० वाजता प्रातःकालीन प्रार्थनेला सिद्ध झाली. नंतर सकाळची प्रार्थना करून, भजनाच्या गजरात पावलीच्या सोहळ्याचा आनंद घेऊन मंडळी मार्गस्त झाली. सूर्योदयच्यावेळी सूर्यनारायणाची प्रार्थनाहि झाली. आज अंतर जास्त असल्यामुळे मंडळींची पाऊले झपझप पडत होती. पायांची चाल व मुखाने नाम हे एकत्र सुरु होते. रामनाम घायला लावून लाखो लोकांना सन्मार्गी लावण्यात व रामनामाचा डंका पिटण्यात ज्यांनी आपले आयुष्य वेचले त्या श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनाची भाविकांना आज खरी ओढ होती. याच कारणास्तव आज मंडळी घाई करीत होती.
न्याहारीची वेळ झाली तशी मंडळी बसण्यासाठी जागा शोधू लागली. रस्तावरील एका गावात एक छान ओसरी असलेले घर दिसले. घर बंद होते पण जागा स्वच्छ होती. त्या घरावर नाव होते “श्रीसद्गुरू कृपा” व त्या खाली लिहिले होते “जयजय रघुवीर समर्थ” ! न्याहारीला बसण्यासाठी यापेक्षा समर्पक जागा आम्हाला असूच शकत नाही. मंडळी तिथेच विसावली. थोड्याच वेळात न्याहरी घेऊन गाडी आली. मुख्य म्हणजे आ.वसू ताई आमच्या सोबत तिथे थांबल्या. सर्वांची न्याहारी झाल्यावर आमच्या पदयात्रेस अनुकूल नामकरण असलेल्या त्या घरसमोर ‘Group Photo Session’ झाले नसते तरच नवल ठरले असते ! आ.वसू ताईंनीहि सर्वांचा हा हट्ट सहर्ष पुरविला.
आज अंतर जास्त असल्यामुळे पाय चांगलेच दुखत होते. मात्र श्री.सुरेशराव (बाबा) काचरे (वय ७९), श्री.पांडुरंगराव देशमुख (वय ७७), श्री.प्रकाशराव कुलकर्णी (वय ७३), गुडघे दुखत असूनहि चालणारे श्री.श्रीपादराव कुरुमभट्टे (वय ६७) व श्री.रमाकांतराव रतकंठवार (वय ६६), कहाळेकर बंधू यांना चालताना पाहून इतरांना तक्रार करायला वावच नव्हता. यांच्या ‘संथ पण ठाम’ चालीमुळे इतर सर्वांना चालत राहण्याची प्रेरणा मिळत होती.
अजून दोन बहिणींची दखल घ्यावीच लागेल ! सौ.उषाताई मुत्तेपवार यांचा गुडघा गेले दोन वर्षांपासून दुखत आहे. या माउलीला घरात चालणेहि एक दिव्य काम होऊन बसले आहे. ही पदयात्रा निघण्याचे ठरल्यावर त्यांनी घरच्यांचा विरोध पत्करून नावनोंदणी केली. पू. अप्पांवर यांची खूपच श्रद्धा ! पू. अप्पा माझ्याकडून ही पदयात्रा पूर्ण करून घेणार हा ठाम विश्वास ! आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी ही पदयात्रा यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्यांचीच बहीण सौ.कमलताई अमिलकंठवार यांची त्यांना बहुमोल साथ मिळाली. कितीहि वेळ लागला तरी या सौ.कमलताई आपल्या बहिणीला सोबत घेऊनच मुक्कामाच्या ठिकाणी यायच्या. गोंदवल्याला आम्ही सगळे दुपारी १२३० पर्यंत पोहोचलो असू. या दोघी बहिणी सायंकाळी ०५ वाजता पोहोचल्या. धन्य आहे या दोघी बहिणीची ! या दोघी मुक्कामाच्या ठिकाणी आल्या म्हणजे सर्व पदयात्री आले, असा संकेत रूढ झाला होता.
महत्वाचे म्हणजे येथे वर ज्यांच्या नावाचा उल्लेख केला आहे, त्या सर्वांचा रोज १२ पाठ करण्याचा संकल्प असायचा. त्यांचे १२ पाठ काय जास्तच होत असतील, यात मुळीच शंका नाही.
श्री महाराजांचे समाधी मंदिरात प्राप्त होताच भाविकांनी शुचिर्भूत होऊन श्री महाराजांच्या समाधी पुढे लोळण घेतले. लांब अंतर, पाय दुखणे, थकवा या शब्दांनाहि तिथे वाव नव्हता. केवळ मनाची शांतता व प्रसन्नता याचा प्रत्यय भाविक अनुभवत होते. समाधी मंदिराचा स्वच्छ, प्रशस्त व प्रसन्न प्रासाद पाहून भाविक मनापासून सुखावले.
आम्हा पदयात्रींसाठी समाधी मंदिराच्या बाजूलाच असलेल्या भक्तनिवासात दोन मोठे हॉल दिले होते. खालच्या हॉल मध्ये महिला व वरच्या हॉल मध्ये पुरुष – अशी सोय केली. संतांच्या प्रतिमेची महिलांच्या हॉल मध्ये स्थापना केली. तिथेच पारायण, कीर्तन झाले. आज डॉ.सौ.स्वातीताई शिरडकर, श्री. व सौ.राळेगणकर, डॉ.सौ.सुनीता डोईबळे पदयात्रेत सामील झाले. श्री. व सौ. वैद्य (कऱ्हाड) हेहि आजच्या दिवसासाठी आले होते. गोरट्याहून १२ ते १५ तरुणांचा गट दोन दिवसासाठी आला होता. त्यामुळे त्या सर्वांना कोणा-कोणाला भेटू असे झाले होते. आपल्या गावाकडील मंडळींना भेटून पदयात्रींनाहि आनंद झाला. निवासाच्या व्यवस्थेसोबतच चहापान, भोजन व्यवस्थाहि संस्थान मार्फत पुरविण्यात आली. त्यामुळे आज आमच्या ‘अन्नपूर्णा’ कक्षातील मंडळींना जरा विश्रंती मिळाली.
गोंदवल्यात श्री.बाळासाहेब तंबाखे यांची भेट झाली. त्यांना भेटून मला आनंद झाला. हे श्री.तंबाखे काका सध्या गोंदवले येथे पूर्ण वेळ सेवेसाठी राहतात. तीन वर्षांपूर्वी झालेल्या गोदापरिक्रमेत श्री.तंबाखे काकाहि सहभागी झाले होते. त्यावेळी गोदापरिक्रमेत सहभागी असलेल्या व आताहि या पदयात्रेत सहभागी असलेल्या भाविकांना भेटून श्री.तंबाखे यांनाहि खूप आनंद वाटला. खूप दिवसांनी जीवाचा जिवलग भेटल्याचा आनंद त्या एकमेकांच्या भेटीतून व्यक्त होत होता. गोंदवले येथील आमच्या मुक्कामासाठी व इतर व्यवस्थेसाठी श्री.तंबाखे यांची भरपूर मदत झाली.
श्रीदासबोधाच्या वाचनात आता श्री.विक्रम आ.वसू ताईंना मदत करू लागले. एक समास विक्रम तर एक समास वसू ताई वाचू लागल्या. आजचे कीर्तन श्री.विक्रम नांदेडकर यांनी केले. त्यांनी आज संत श्रीगोरोबा काकांचे आख्यान सांगितले. संवादिनीच्या साथीला अर्थातच श्री.रावसाहेब सावंत होतेच. श्री.विक्रम यांचे आजचेहि कीर्तन छान झाले. मोठा कथाभाग असूनहि नेमून दिलेल्या वेळेत सर्व कथाभाग त्यांनी व्यवस्थित सांगितला. कीर्तनानंतर लगेचच पाठ घेण्यात आला.
पंढरपुरात पदयात्रेपासून श्री.विनायकराव शरीराने दूर झाले खरे, पण त्यांचे मन सतत पदयात्रेच गुंतलेले असायचे. दिवसातून कमीतकमी ४/५ वेळेस फोन करून पदयात्रेची नेमकी स्थिती काय आहे, कसे चालू आहे याची चौकशी करायचे, असे श्री.रामा अन्नपूर्णे यांनी सांगितले. सात्विक ध्येयासक्त ओढ काय असते हे यावरून लक्षात आले.
कीर्तनानंतर मंडळी श्री महाराजांच्या समाधीच्या दर्शनासह, श्री महाराजांचे घर, थोरले राम मंदिर, धाकले राम मंदिर व मारुती मंदिर येथे दर्शनाला जाऊन आली. जेवणानंतर श्री महाराजांच्या शेजारतीला उपस्थित राहून व श्री महाराजांकडे “कर्णी पडो संतकीर्ती l हृदयी राहो सद्भक्ती l वाणी नाम जपावरती l राहो सदा गुंतोन ll” असे मागणे मागून मंडळी सहब्रह्मचारिणीच्या चरणी लीन झाली.
(८) दि.०२/०२/२०१९, शनिवार = गोंदवले ते निढळ, ता. खटाव.
अंतर १९ किमी / मुक्काम : कृष्णाकोयना मंगल कार्यालय, निढळ.
थंडी जणू आमची परीक्षा बघत होती आणि आम्हीहि माघार घायला तयार नव्हतो. बरीच मंडळी आवरून श्री महाराजांच्या समाधी मंदिरातील काकड आरतीला उपस्थित होती. ठरल्या वेळी आमची सकाळची प्रार्थना झाली व समाधी मंदिराच्या समोरील मोकळ्या जागेत मंडळी शिस्तीत उभी ठाकली. तिथे भजनाच्या गजरात पावलीचा सोहळा रंगला. पदयात्रेत काल नव्याने आलेले भाविक व गोरट्याहून आलेली नव्या दमाची तरुण मंडळी यांच्या समावेशामुळे आजचा पावलीचा सोहळा व नंतर नामाचा गजर खूपच रंगला. गोरट्यात जेव्हा प्रभातफेरी निघते तेव्हा बहुतेक वेळी मृदंग वाजविण्याची जबाबदारी श्री.पिराजी मिरेवाड सांभाळतात. ते स्वतः आज मृदंग वाजवायला उभे होते, त्यामुळे मृदंगाच्या साथीची आज वेगळीच रंगत होती. श्री महाराजांच्या समाधी मंदिरास उजवे घेत दिंडी मार्गस्त झाली. मंदिर परिसरातील इतर सर्व भाविक कौतुकाने आमच्या दिंडीला न्याहाळत होते.
मंदिराबाहेर मुख्य रस्त्यावर पदयात्रा आल्यानंतर स्वतः आ.वसू ताईंनी “श्रीनारायण जयनारायण जयजय नारायण नारायण” या भजनाचा ठेका धरला. देहभान विसरून त्या गात होत्याच; त्या भजनानंदात त्यांनी सर्व पदयात्रींनाहि आकंठ बुडविले. सर्वांनाच खूप आनंद मिळाला. आजच्या सूर्यनारायणाच्या प्रार्थनेला भरपूर संख्येने भाविक उपस्थित होते. पदयात्रींनी वेळेचा अंदाज घेत न्याहारीची वेळ जवळ आल्याने झाडांच्या सावलीत जागा शोधून बैठक मांडली. तेथून जवळच एका शेतकऱ्याचे घर होते. त्या घरातील दोन माउली मोठे बसकन घेऊन आल्या व त्यावरच बसण्याचा आग्रह करू लागल्या. त्यांचा आग्रह मोडण्याचे काही कारणच नव्हते. आमच्या भजनात त्याहि सहभागी झाल्या. थोड्याच वेळेत न्याहरी घेऊन गाडी आली. आजची न्याहरी सुद्धा गोंदवले संस्थानच्या वतीने पुरविली होती. श्री महाराजांचा हाहि प्रसाद भाविकांनी प्रेमादराने ग्रहण केला. त्या शेतकरी कुटुंबातील माउलींनाहि न्याहारीप्रसाद दिला.
आज पदयात्रेत अनोखा एकेमवाद्वितीय योग जुळून आला. या पदयात्रेत एकमेकांच्या ओळखीचे जिवलग मित्र होते, मैत्रिणी होत्या, बहिणी होत्या, भाऊ होते, जावा होत्या, नणंदा होत्या, काका-पुतणे होते, मामा-भाचे होते, साडू होते, पिता-पुत्र होते, बाप-लेक होते, पती-पत्नीच्या जोड्या तर बऱ्याच होत्या. एकंदरीत दोन पिढीतील प्रत्येक नात्याच्या जोड्या होत्या. एक दुर्मिळ योग असा जुळून आला की आज पदयात्रेत श्री.अशोकराव, त्यांचा मुलगा श्री.अमोल व नातू चि.अर्णव अशा तीन पिढ्या एकत्र आल्या. श्री.अशोकरावांची पत्नी सौ.स्वाती, त्यांची सून सौ.कीर्ती व नात कु.अवनी अशा तीन पिढ्यांच्या प्रतिनिधी महिलांच्या बाजूनेहि उपस्थित होत्या. या अद्वितीय योगानिमित्त सर्वांनी कुलकर्णी कुटुंबियांचे अभिनंदन केले व या जुळून आलेल्या दुर्मिळ योगाची टाळ्यांचा गजरात दखल घेतली. मग तिथे पती-पत्नी या नेहमीच्या जोडीसवे सासू-सुन, सासरा-सुन, आजोबा-नात, आजी-नात अशा अनोख्या जोड्याने फुगडीचा खेळ रंगला.
कालच्या पेक्षा आजचे अंतर थोडे कमी असले तरी चढाव व घाट रस्त्याने सर्वांचीच दमछाक झाली. त्यामुळे विसाव्याचे टप्पे वाढत होते. १२३० वाजता दिंडी निढळ गावाच्या चौकात आली. मुक्कामाचे ठिकाण तेथून २ किमी अंतरावर होते. त्यामुळे त्या चौकातील श्रीगणपतीच्या मंदिरात मंडळी विसावली. पाय दुखत असले तरी भजन चालूच होते. तिथे सर्वांनी उसाचा रस प्याला. तिथे एक अवलियाहि आमच्या सोबत बसला होता. आम्ही निघण्याच्या तयारीत असताना असताना – ‘कुठं निघालात ? मलाही एक भजन म्हणायचे आहे. चला, साथ करा’ – असे म्हणून गाऊ लागला. त्या बाबाने “अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग” हा संत चोखामेळा यांचा अभंग अप्रतिमरीत्या गायला. त्यांच्या ताना ऐकून अंगावर शहारे येत होते. आपल्या साथकाऱ्यांनी त्यांच्या गायनाला उत्तम साथ केली. पदयात्रा पंढपुरातून निघताना नामदेव पायरी जवळच्या संत चोखामेळा यांचे दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो. या निमित्ताने ती आठवण जागी झाली. त्या बाबाचा निरोप घेतला व श्रीगणरायाचे आशीर्वाद घेऊन आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी ०१३० वाजता आलो.
सौ.उषाताई व सौ.कमलताई या भगिनींना मुक्कामाच्या ठिकाणी पोचायला ०५३० वाजले होते, या वरूनहि आजच्या त्या मानाने अंतर कमी असणाऱ्या खडतर चालीची कल्पना येऊ शकते. पण या पदयात्रेतील सर्वात लांबीचे दोन टप्पे पूर्ण झाल्याचा सर्वांनाच आनंद झाला होता. आजच्या मार्गावर उजव्या बाजूला शिवकालीन “महिमानगड” या किल्ल्याचे दर्शन झाले.
भोजन, पारायण, कीर्तन व कीर्तनानंतर लेगचच पाठ असे सर्व कार्यक्रम व्यवस्थित झाले. आज पू.अप्पांच्या जीवनचरित्रावर आधारित असलेले कीर्तन, तरुण साधक श्री.रामदास टेकाळे यांनी केले. मुख्य म्हणजे हे कीर्तन त्यांनी स्वतः रचलेले आहे. आपल्याकडे जी परंपरागत कीर्तने होतात त्याच ढाच्यात त्यांनी कीर्तन रचले आहे. कीर्तनात असणारे साकी, आर्या, श्लोक, ओव्या, उपदेशपरपदे, कटाव, दिंड्या हे व इतर काव्य प्रकार त्यांनी चपखलपणे वापरले आहेत. सर्व पदे स्वतः गाऊन त्या पदांचे अनुरूप विवेचनहि केले. कीर्तन खूप भावपूर्ण झाले. श्री.रामदास टेकाळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! आजच्या कीर्तनात तबल्याची साथ लाभली. तबल्याच्या साथीला श्री.पिराजी मिरेवाड व संवादिनीच्या साथीला अर्थातच श्री.रावसाहेब सावंत होते.
रोज झोपण्यापूर्वी रात्री प्रत्येकाची स्वतःच स्वतःचे पाय चेपणे, पायाला तेल चोळणे, जखमांना मलम लावणे अशी पादसेवा असायची. असे स्वयंपादसंवाहन करून मंडळी निद्रिस्त झाली.
(९) दि.०३/०२/२०१९, रविवार = निढळ ते पुसेगाव, ता. खटाव.
अंतर ०८ किमी / मुक्काम : भक्तनिवास, श्रीसेवागिरी महाराज संस्थान, पुसेगाव.
सर्व पदयात्रींचे आवरून झाल्यावर प्रातःकालीन प्रार्थना, मंगल कार्यालयाच्या आवारात भजनाच्या गजरात पावलीचा खेळ रंगला व दिंडी मार्गस्त झाली. गोरट्याहून आलेला युवकांचा गट आज परतायचा होता. सौ.मीराताई जोशी याहि त्यांच्यासवे नांदेडला जाणार होत्या. काही पाऊले चालून झाल्यावर ती मंडळी आमचा निरोप घेऊ लागली. हा आनंद सोहळा सोडून जाणे त्यांना खूप कठीण जात होते. त्या प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. दूध पिणाऱ्या वासराला गायीच्या कासेपासून ओढताना जी अवस्था वासराची होते, तशीच अवस्था या सर्वांची झाली होती. पण काही नाही तर दोन दिवस का होईना, सहभागी झाल्याचा आनंद घेतलात ना ? असे समजावून दिल्यावर मोठ्या जड अंतःकरणाने त्यांनी आमचा निरोप घेतला.
पदयात्रेचा आनंदसोहळा मधेच सोडून परत जाताना सर्वांची अशीच अवस्था होत होती.
आज फक्त ०८ किमी अंतर चालायचे होते. ‘१२ च्या आत मुक्कामाच्या ठिकाणी यायचे नाही’ ही सूचना लक्षात घेता आज आमच्याकडे भरपूर वेळ होता. पाऊले आज मंदगतीनेच पडत असली तरी आमची त्याला हरकत नव्हती. आजची न्याहरी बाहेर पडतानाच आम्हाला सोबत दिली होती. त्यामुळे आजचा वेळ आम्ही आमच्या सोयीनुसार व्यतीत करू शकणार होतो. काही अंतर चालून गेल्यावर आम्ही झाडाची सावली पाहून विसावलो व न्याहरी केली. तिथे आम्ही सर्वांनी मिळून श्रीविष्णुसहस्रनामाचा पाठ केला, श्रीपांडुरंग स्तोत्र व ‘करुणाकरा अनंता’ ही प्रार्थना म्हणली. आमच्या सर्वांच्या आग्रहाला मान देऊन “लुगडं” गाण्याची फर्माईश गोरट्याच्या माउल्यांनी आनंदाने पूर्ण केली.
नंतर पुन्हा आम्ही मार्ग आक्रमू लागलो. थोडे चालून गेल्यावर पुसेगाव दिसू लागले. घड्याळात फक्त १०३० वाजले होते. रस्त्याच्या कडेला डाव्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेवर आम्ही बैठक मांडली. तिथे भजनं, गवळणी, भारुडं यांचा कार्यक्रम भरपूर रंगला. देवीचा जोगवा गाताना सौ.साधनाताई देहभान हरपून देवी अंगात आल्यागत नाचतहि होत्या. त्यांचे यजमान श्री.शरदराव उमरीकर हेहि त्यांना उत्तम साथ करीत होते. या दोघांनी मिळून सर्व पदयात्रेत विविध खेळ खेळून भरपूर सात्विक आनंद लुटला. या उभयंत्यांच्या उत्साहाचे कौतुक करावे तेवढे कमी आहे. भजनकऱ्यांची बैठक बसली आहे आणि सौ.साधनाताई यांनी नाचून गवळण म्हणली नाही, असे कुठेच झाले नाही. इतके करून मुक्कामाच्या ठिकाणी साधनाताई पंक्ती वाढायला उभ्याच असायच्या. “जे करणे असेल ते खरे करा तत्त्वता” हे ब्रीद त्यांनी पाळले.
श्री.सुधीरराव शिरडकर तसेच नांदेडहून आलेले आमचे आजचे कीर्तनकार श्री.विवेक इनामदार (सर), त्यांचे बंधू श्री.विश्वास, स्नेही श्री.एकनाथराव कोंडावार हे याच बैठकीत आमच्यात सामील झाले. त्यांनीहि या भजनानंदाचा आस्वाद लुटला.
पुसेगावात आल्यानंतर एका छोट्या हॉटेलवाल्याने आम्हा सर्वांना चहा दिला. भजनकऱ्यांनी तिथे काही भजनं म्हणली. विणेकरी श्री.रावसाहेब सावंत यांचा सत्कारहि केला. त्याचा भाव इतका चांगला होता की, तो आम्हाला म्हणाला – तुम्ही आधी कल्पना दिली असती तर तुम्हा साऱ्यांना नाश्ता दिला असता. सन्माननीय कौतुकास्पद भाव !
एव्हाना आता १२ वाजत आले होते व आमची दिंडीहि मुक्कामाच्या ठिकाणी पोहंचली. श्री सेवागिरी महाराज हे एक अधिकारी सत्पुरुष होऊन गेले आहेत. त्यांनी एकदा सगळ्या गावाला जेवणाचे आमंत्रण दिले. कुटाळक्या करणाऱ्यांना वाटले हा फकीर माणूस, सगळ्या गावाला कसे काय जेवण देणार. ‘फजिती पाहू या’ म्हणून आले पण त्यांनी श्री सेवागिरी महाराजांचा अधिकार ओळखला नव्हता. महाराज एका मोठ्या वडाच्या झाडाखाली झोळी पसरून उभे राहिले व भगवंताची आळवणी केली. तो आश्चर्य म्हणजे अख्खा गाव जेवून जाईल इतके अन्न त्यांच्या झोळीतून प्राप्त झाले. या चमत्कारामुळे जनसामान्यांना महाराजांचा अधिकार समजला. त्याच मोठ्या वडाच्या वृक्षाजवळ महाराजांची समाधी आहे. समाधीचे दर्शन घेण्यासाठी खाली गाभाऱ्यात जावे लागते. समाधी मंदिर भव्य आहे. त्याच परिसरात श्रीशंकराचे व इतर देवतांचीहि मंदिरे आहेत. मोठे जागृत ठिकाण आहे. श्री सेवागिरी महाराजांच्या आमवस्येच्या दर्शनाचे महत्व असून दर अमावस्येला येथे भाविकांची मोठी गर्दी उसळते.
मंदिरासमोर असलेल्या संस्थानच्या भक्तनिवासामध्ये आमच्या मुक्कामाची सोय होती. पुरुष व महिलांना स्वतंत्र दोन मोठे हॉल दिले होते. आज व्यवस्थापक मंडळाने सर्व पदयात्रींना इडली – चटणी – सांबर ची मेजवानी देऊन एक सुखद आश्चर्याचा धक्का दिला. इडलीचा बेत फक्कड जमला होता. आग्रहाने इडली वाढली जात होती. तृप्ततेचा भाव पदयात्रींच्या चेहऱ्यावर सहजपणे प्रगटत होता. सर्वजण व्यवस्थापक मंडळींचे मनापासून आभार देत विश्रंतीसाठी गेले.
मंदिरात दररोज सायंकाळी ०७ वाजता महाराजांच्या समाधीपुढे आरती होते. आजचे कीर्तन मंदिरात होणार असल्याने आजच्या कार्यक्रमांच्या वेळात बदल करण्यात आला. विश्रांतीनंतर ०४१५ ते ०४४५ पारायण, ०४४५ ते ०५१५ चहापान व ०५१५ ते ०६४५ कीर्तन अशा वेळा निश्चित केल्या. त्यानुसार सर्व कार्यक्रम पूर्ण झाले. आजचे कीर्तन डॉ.विवेक इनामदार यांचे झाले. त्यांनी श्रीरामदास स्वामींचे आख्यान सांगितले. कीर्तन छान झाले. विशेष म्हणजे संवादिनीच्या साथीसह श्री.रावसाहेब यांनी आज कीर्तनातील पदे गाऊनहि श्री.इनामदार यांना साथ केली. कीर्तन सेवा पूर्ण करून इनामदार बंधू व श्री.कोंडावार नांदेडला परत गेले.
अल्पोहारानंतर रात्री ०८३० वाजता पाठ झाला. इडलीची चव जिभेवर रेंगाळतच होती. इडलीच्या मेजवानीचे स्मरण करीत मंडळी निद्रदेवीची आळवणी करू लागली. निद्रादेवीची प्रार्थना करायला अवकाश की ती हि सर्वांवर त्वरित प्रसन्न झाली.
(१०) दि.०४/०२/२०१९, सोमवार = पुसेगाव ते कोरेगाव, ता. कोरेगाव.
अंतर १६ किमी / मुक्काम : स्वयंवर मंगल कार्यालय, कोरेगाव.
आज सोमवती / मौनी / पौष अमावस्या असल्याने सर्वजण लवकर आवरून श्री सेवागिरी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊनच प्रातःकालीन प्रार्थनेला बसले. प्रार्थनेनंतर भजनाच्या गजरात पावलीचा सोहळा नेहमीप्रमाणे रंगला. दिंडी मार्गस्थ झाली. पुढे सूर्यनारायणाचीहि प्रार्थना झाली. आज आमच्या उजव्या बाजूला अजून एक शिवकलीन किल्ला “वर्धमानगड” याचे दर्शन झाले. किल्ल्याच्या अगदी बाजूने घाट रास्ता होता पण तो उताराचा असल्याने त्रास झाला नाही. भजने म्हणत, देवाचे नाव घेत दिंडीचे मार्गक्रमण सुरु होते.
आ.वसू ताई सकाळच्या प्रार्थनेनंतर व रात्रीच्या पाठानंतर बऱ्याचदा श्रीरामाचे एक सुंदर भजन सांगायच्या. ते भजन होते –
मंगलभवन अमंगलहारी, द्रववू सो दशरथ अजीर विहारी
ओ राजाराम राम राम सीताराम राम राम
भजनाची एक ओळ त्या म्हणायच्या व त्यांच्या मागे आम्ही सर्वजण म्हणायचो. भजनाची चाल छान असल्याने ते भजन मनाचा ठाव घ्यायचे. पण त्यातील “द्रववू सो दशरथ अजीर विहारी” या ओळीचा अर्थ काही ध्यानात येत नव्हता. काल रात्री पाठ झाल्यानंतर मी त्यांनाच त्या ओळीचा अर्थ विचारला. त्यांनी मला तो खूप छान समजावून सांगितला. तो अर्थ असा – अजीर म्हणजे आंगण, विहारी म्हणजे ज्याने विहार केला आहे तो. द्रववू सो म्हणजे त्याला माझ्याबद्दल करुणा येऊ दे, त्याचे हृदय माझ्याबद्दल दयार्द्र असू दे. म्हणजे ज्याने दशरथाच्या अंगणात विहार केला आहे, जो दशरथाच्या अंगणात खेळला आहे, कोण ? तर तो श्रीराम, त्याचे हृदय माझ्याप्रति दयाळू असू दे. किती सुंदर अर्थ आहे ! या भजनाचा हा भावार्थ मी आज सोबतच्या मंडळींनाहि सांगितला. कोणालाच अर्थ माहित नसल्याने सर्वांनाच तो भावार्थ खूप आवडला.
व्यवस्थापक मंडळींनी नेहमीप्रमाणे वाटेत सर्वांना न्याहरी पुरविण्याची कामगिरी चोख बजावली. पदयात्रींना वेळेत न्याहारी पोचविता आली नाही तर यांना अपराध्यासारखे वाटायचे, या एकाच उल्लेखावरून त्यांचा सेवाभाव लक्षात यावा. सर्व पदयात्री यांच्या इतके पक्के डोक्यात बसले होते की, एखाद्याला न्याहारी द्यायची राहिली तर त्याला रस्त्यावर असेल तिथे शोधून न्याहारी देणारच. असे झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते हाताशी असल्यावर तो कार्यक्रम यशस्वी होणार, हे निश्चित आहे.
दुपारी १२च्या सुमारास आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी पोहंचलो. रोज आवरून निघताना आम्ही आमच्या सामानाच्या बॅगा एकेठिकणी जमा करून ठेवत असू. पुढच्या मुक्कामाच्या ठिकणी गेलो की आमच्या ताब्यात घेत असू. एकदा सेवेकऱ्याला मी विचारले, किती बॅगा आहेत ? तो म्हणाला – ४०० बॅगा रोज आम्हाला टेम्पोतून काढाव्या लागतात व रोज तेवढ्याच परत टेम्पोत भराव्या लागतात. रोज ०३ तास लागतात. मी तर थक्कच झालो ! रोज सकाळी सगळ्यात आधी उठून दोन मोठी भांडी भरून पाणी तापायला ठेवणे, सगळ्यांना गरम पाणी काढून देणे, सतरंज्या घालणे – काढणे, जेवायला वाढणे, स्वयंपाक घरात लागणारे सामान काढून देणे, पदयात्रींना काय हवे-नको ते पाहणे, अशी अनेक कामे या सेवेकऱ्यांना रोज न थकता, कंटाळा न करता करावी लागत. श्री.गंगाधर गोडगे, श्री.देविदास भिंगे, श्री.माधव नागधरे व श्री.मानेजी खांडरे या गोरट्याच्या सेवेकऱ्यांनी ही अनेक कामे सदैव हसतमुखाने केली.
तीच गोष्ट महिला सेवेकऱ्यांचीहि ! स्वैपाकात संपूर्ण मदत करणे, भाज्या चिरणे, धान्य निवडून देणे, भांडी घासणे, पोळ्या लाटणे – भाजने अशी अनेकानेक कामे त्यांनाहि करावी लागत. ही जबाबदारी सौ.प्रयागबाई, सौ.जिजाबाई व सौ.प्रयागबाई या तिघींनी यशस्वीपणे पेलली.
सामानाच्या बॅगा वाहून नेण्यासाठी पंढरपूर येथून एक वेगळा टेम्पो ठेवावा लागला होता. याचा चालक श्री.लखन पवार याचेहि उत्तम सहकार्य लाभले. स्वैपाक बनविण्याचे सर्व साहित्य, चटण्या, लोणची, भांडी, सतरंज्या, टेबल, खुर्च्या, रोजच्या कार्यक्रमाला लागणारे पेटी, माईक असे अनेकानेक साहित्य गोरट्याहूनच आणले होते. त्यासाठीहि एक वेगळा टेम्पो ठेवला होता. याचा चालक श्री.सूर्यकांत (मुखेड) याचेहि उत्तम सहकार्य लाभले. रोजच्या कामात मदत व्हावी म्हणून कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी बोलेरो जीप ठेवण्यात आली होती. दोन मुक्कामातील अंतर जेवढे असायचे त्याच्या दहापट या जीपची धाव व्हायची. कामासाठी दिवसातून कितीहि वेळा जीप काढावी लागली तरी जीपचा चालक श्री.राजू भंडारवाड आनंदाने तयार असायचा.
पंढरपूरचे श्री.मंदार जोशी यांचेहि या पदयात्रेच्या नियोजनात बहुमोल सहकार्य लाभले. पंढरपूर नगर परिषदचे फिरते शौचकूप उपलब्ध करून देणे, सामानासाठी टेम्पो ठरवून देणे, पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देणे – ही व या सारखी अनेक कठीण कामे त्यांच्या सहकार्यामुळे सहजतेने पूर्ण झाली.
रोजचा स्वैपाक बनविण्याची जबाबदारी सौ.रत्नमाला गिरगावकर यांच्या कडे होती. रत्नमाला मावशीच्या हाताने बनविलेले सुग्रास, रुचकर जेवण केले की जीवाला तृप्तता यायची. त्यांनी शिजविलेल्या अन्नाला एक वेगळीच छान चव असायची. या माउलीला अन्नपूर्णा प्रसन्न आहे. रोज २०० माणसांसाठी दोन वेळ चहा, सकाळचा नाश्ता, स्वयंपाक व अल्पोपहाराचे पदार्थ त्या हसत – खेळत बनवायच्या.
श्री.शिवा गोडगे, कु.विमल सावंत यांच्या बद्दलच्या भावना व्यक्त करताना शब्द अपुरे पडतात. ही दोघे म्हणजे आ.वसू ताईंचे (विस्तारित) दोन हात आहेत, असे म्हणाले तरी पुरे आहे. वसू ताईंचा प्रत्येक शब्द, प्रत्येक आदेश तंतोतंत पाळणे एव्हढेच यांना माहित आहे. “जिथे कमी, तिथे आम्ही” अशी या दोघांची ख्याती आहे. तीच गत कु.सविता सावळे ची; विमलताईच्या बरोबरीने ती सर्व कामासाठी सतत सिद्ध असते.
या सर्वांनी पुरविलेली सेवा बहुमोल आहे. त्या सेवेचे, त्यांच्या सेवाभावाचे मोल होणे अशक्य आहे. श्री नारायणाची त्यांच्यावर सतत कृपा असावी, हेच मागणे या सर्वांसाठी मागू या.
श्री.मोहनराव लिगदे, श्री.अनिल बोर्डे, श्री.विकास व श्री.विलास या कवटीकवार बंधू यांनी घेतलेल्या मेहनतीचे कष्ट कसे शब्दबद्ध करावेत ? गेले काही महिने हे सर्वजण पदयात्रामय होऊन गेले होते. स्वतःच्या संसारिक जबाबदाऱ्या बाजूला सारून “आधी लगीन कोंडाण्याचे” या बाण्याने ते झटत होते. ही सर्व मंडळी सद्गुरुप्रति असलेल्या निष्ठेपोटी ‘सद्गुरुंची सेवा’ या उदात्त भावनेने हे काम करायचे. या सर्वांना मनापासून प्रणाम !
या सर्वांचे आभार व्यक्त करणे यांनाहि आवडणार नाही. पण एकच सांगतो, आमची ही पदयात्रा यशस्वी पूर्ण होण्यामागे तुम्हा सर्वांची अथक, अविश्रांत मेहनत आहे. या पदयात्रेतून जे काही पुण्य आम्हाला मिळाले आहे, ते सर्व तुमच्यामुळे आहे, नव्हे नव्हे तुमचेच आहे. (विषय निघाला म्हणून या सर्व सेवेकऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा ‘सादर’ नामोल्लेख केला.)
ठरल्यावेळेनुसार आज सर्व कार्यक्रम झाले. आजचे कीर्तन श्री.विलासराव रेणापूरकर यांचे झाले. त्यांनी संत श्रीनरहरि सोनार हे आख्यान सांगितले. कीर्तन सांगताना ते कथाभागाशी एकरूप झाले होते. त्यामुळे कीर्तन खूप रंगले. श्री.रेणापूरकर यांचे हेहि अख्खे कीर्तन मुखोद्गत होते. आता पर्यंत श्री.रेणापूरकर यांच्या तोंडून बरीच कीर्तने ऐकली आहेत. प्रत्येक कीर्तन यांचे तोंडपाठ असते. एक पदहि पुढेमागे होत नाही. हे त्यांना कसे काय जमते, हा सर्वांच्याच कौतुकाचा विषय होता. श्री.विलासराव रेणापूरकर औरंगाबादहून खास कीर्तन सेवा करण्यासाठी आले होते. कीर्तनानंतर लगेचच ते परत गेले. कीर्तनानंतर लगेचच पाठ घेण्यात आला. डॉ. सौ.स्वातीताईंच्या नातवाचा आज पहिला वाढदिवस होता, त्यानिमित्त त्यांनी मिठाई वाटून सर्वांचे तोंड गोड केले. सर्वांनी त्यांच्या नातवाचे अभिष्टचिंतन केले व दीर्घायुसाठी शुभेच्छा दिल्या.
पदयात्रेत डॉक्टर आलेले पाहून पदयात्रींच्या पाय / अंग दुखण्याचे प्रमाण वाढले की काय असे वाटू लागले. जो तो येऊन डॉ. सौ.स्वातीताईंकडे तक्रारींचा पाढा वाचू लागला. डॉ. स्वातीताई आंनदाने स्वतः कडे असलेल्या कौशल्याचा उपयोग करीत स्वतः जवळच्या औषधी गोळ्या गरजेनुसार देऊन प्रत्येकाचे समाधान करीत होत्या.
पदयात्रेत बऱ्याच नव्या ओळखी झाल्या होत्या. जुन्या पण विरळ झालेल्या ओळखी, दृढ झाल्या होत्या. पदयात्रेच्या सांगतेचा दिवस जवळ येत चालला होता. त्यामुळे पदयात्रेनंतर संपर्कासाठी एकमेकांच्या भ्रमणध्वनी क्रमांकाची देवाण-घेवाण सुरु झाली. एकमेकांसोबत व्यतीत केलेल्या आनंददायी आठवणींची उजळणी करीत मंडळी झोपी गेली.
(११) दि.०५/०२/२०१९, मंगळवार = कोरेगाव ते सातारा.
अंतर १४ किमी / मुक्काम : वेदभवन / मंगल कार्यालय, सातारा.
नेहमीप्रमाणे सर्वजण लवकर आवरून प्रातःकालीन प्रार्थनेला बसले. प्रार्थनेनंतर भजनाच्या गजरात पावलीचा सोहळा नेहमीप्रमाणे रंगला व दिंडी मार्गस्थ झाली.
मी व श्री.भिडे काका मात्र आज दिंडी सोबत चाललो नाही. कारण पुढे लवकर जाऊन आम्हाला परतीसाठी बसेस ठरवायच्या होत्या. साताऱ्याचेच असल्याने श्री.भिडे काकांच्या बऱ्याच ओळखी होत्या. तेव्हा व्यवस्थापक मंडळाने गाडी ठरविण्याची जबाबदारी आमच्यावर सोपविली होती. कोरेगाव ओलांडून पुढे आल्यावर ‘वसना’ नदी लागली. नंतर पुढे श्रीरामदास स्वामींनी ज्या किल्ल्यावर तपाचरण केले तो जरंडेश्वर किल्ला उजव्या हाताला सारखा सोबतीला होता. श्री दासगणू महाराजांनी रचलेल्या “श्रीसमर्थाष्टक” मध्ये तिसऱ्या श्लोकात “जरंड्यास जे राहिले येऊनिया” असा याचा उल्लेख केला आहे. नंतर त्रिपुटी येथे नाथ परंपरेतील एक संत श्री गोपाळनाथ यांच्या समाधीचे दर्शन घेतले. मोठे पवित्र ठिकाण आहे. यांनी जिवंत समाधी घेतली आहे, अशी माहिती श्री.भिडे काकांनी दिली. या मंदिराच्या बाजूला एक भव्य मानवनिर्मित तलाव आहे; तोही पहिला. श्री दासगणू महाराजांचे जसे गोदावरी नदीवर अतीव प्रेम व श्रद्धा आहे, पू. वासुदेवानंद सरस्वती (टेम्ब्ये स्वामी) यांचे तसेच प्रेम व श्रद्धा कृष्णा नदीवर आहे. साताऱ्याच्या जवळ त्या कृष्णेचे दर्शन झाले.
हे श्री.भिडे काका म्हणजे मोठे व्यासंगी, बहुश्रुत व्यक्तिमत्व ! संघाचे कार्यकर्ते. बऱ्याच सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग त्यांनी घेतला आहे. त्यांच्या सोबत आल्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाची जवळून ओळख पटली. साताऱ्यात सर्व हयात गेली असल्याने भरपूर ओळखी. त्यांच्या ओळखीने सज्जनगड ते सातारा येण्यासाठी आम्ही गाडी ठरवून आलो. त्यांच्या ओळखीचा चांगलाच फायदा झाला.
पदयात्रेचा सोहळा पहाण्यासाठी डॉ.कल्याणीताई नामजोशी, सौ. व श्री. प्रकाशराव मेहेंदळे हे पुण्याहून मुद्दाम आले होते. मी मुक्कामाच्या ठिकाणी लवकर पोहंचलो तेव्हा तिथे त्यांची भेट झाली. त्यांच्या वाहनाने त्यांना घेऊन मी पुन्हा दिंडी कडे आलो. उन्हात सर्व पदयात्री भजने गात चालत आहेत, हे पाहून डॉ.कल्याणीताईंना मोठे कौतुक वाटले. पदयात्रींना भेटून व दिंडी सोहळा पाहून त्यांना आनंद झाला. या तिघांना भेटून पदयात्रींनाहि आनंद झाला. पदयात्रींनी त्यांना खेळ खेळण्याचा आग्रह केला. त्या आग्रहाला मान देऊन त्या सर्वांनी खेळ खेळले. हे तिघे भगवी ध्वजा घेऊन दिंडी सोबत थोडे अंतर चालले. दिंडी सोहळ्याच्या आंनदाचा आस्वाद घेऊन ही मंडळी परतली.
आज पुन्हा एकदा आ.वसू ताईंच्या कीर्तनाचा योग जुळून आला. त्यांनी संत मीराबाईचे आख्यान सांगितले. अर्थातच कीर्तन छान झाले. कीर्तनानंतर लगेचच पाठ घेण्यात आला. त्यानंतर वसू ताई मा.श्री.मारुती बुवा भोसले यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांना भेटायला गेल्या.
वेदाध्ययन म्हणजे पू. अप्पांच्या जिव्हाळ्याचा विषय ! या वेदभवनात वेदपाठशाळा चालविल्या जाते. त्यांच्या या कार्याला मदत करण्यासाठी आ.वसू ताईंनी देणगी जमा करण्याचे पदयात्रींना आवाहन केले. त्यास भाविकांनी उत्तम प्रतिसाद दिला. जमा झालेली सर्व रक्कम वेदपाशाळेच्या कार्यासाठी देण्यात आली.
मी आज दिंडी सोबत नव्ह्तो. पण नंतर कळले की आजहि सर्वांनी भरपूर आनंद लुटला. आज तर भगवंताच्या लग्नाचा सोहळा रंगला होता म्हणे ! श्री. व सौ. शेंदूरवाडकर हे दोघे “श्रीपद्मनाभलक्ष्मी” म्हणून प्रतीकात्मक उभे होते. ताला सुरात – मंगलाष्टकं म्हणत व टाळ्यांच्या गजरात भगवंताच्या लग्नाचा सोहळा संपन्न झाला. श्री. व सौ. शेंदूरवाडकर या दोघांना हे भाग्य लाभले, याचा त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख माझ्याकडे व्यक्त केला.
आज ०५ फेब्रुवारी ! या “श्रीपद्मनाभलक्ष्मी” रुपी नवदांपत्यांना लक्ष लक्ष शुभेच्छा ! यांच्या संसारावर सौख्य – समाधानरुपी ‘उल्कांचा’ वर्षाव सतत होऊ देत, हीच सदिच्छा !
साताऱ्याच्या मुक्कामात आ.वसू ताईंनी मला एक मंगलवार्ता दिली की, गडावर समर्थांच्या समाधीला पदयात्रींच्या वतीने अभिषेक होणार आहे, त्याला आम्ही दोघांनी बसायचे आहे. गडावर पोचायच्या आधीच पदयात्रेचे फल प्राप्त झाल्याचा मला आनंद झाला. तथापि अभिषेकाला बसायचे असेल तर मला सोवळे व सौ.तनुजाला नऊवार साडी आवश्यक आहे, अशी सूचनाहि दिली. सोबत आणले नसेल तर साताऱ्यात छान मिळेल, विकत घ्या – असेहि सुचविले. श्री.बाबा काचरे यांनी सोवळे आणले आहे, असे बाबानींच मला सांगितले होते. मी ते सोवळे मला उपलब्ध करून देण्याची विनंती केली. “सोवळे आणल्याचा उपयोग झाला” असे म्हणत त्यांनी आनंदाने त्यांचे सोवळे माझ्या हवाली केले. सौ.तनुजाने मात्र ही संधी साधून साताऱ्यात नवीन नऊवार “लुगडं” घेतले. पदयात्रेत सतत “घ्याना हो … मला बी लुगडं” चा घोषा चालवला होता, मागणी लावून धरली होती, त्याची पूर्तता करून घेतली.
रात्री उशिरा चि. सर्वेश मुंबईहून आला व आमच्यात सहभागी झाला.
पदयात्रा आता पूर्णतेच्या समीप आली होती. त्यामुळे एकप्रकारची हुरहूर भाविकांच्या बोलण्यातून डोकावू लागली होती. रोज झोपताना उद्याची तयारी करून मंडळी झोपी जायची. पण आता ती तयारी करायला नको वाटत होते. कारण उद्याची तयारी करायची म्हणजे या आनंद सोहळ्याच्या सांगतेला एक दिवस अलीकडे ओढण्यासारखे होते. त्यामुळे आपण झोपूच नये असे बहुतेक सर्वांना वाटत होते. पण काळ कोणासाठीच थांबत नाही. ही अपरिहार्यता स्वीकारून जड मनाने मंडळी शरीरधर्म म्हणून झोपी गेली.
(उर्वरित वृत्तांतासाठी शेवटचा भाग क्र. ४ पहा)