ॐ  श्री  卐

ll श्रीशंकर ll

पंढरपूर ते सज्जनगड पदयात्रा करताना मी जे प्रसंग अनुभवले, ज्या घटना मला भावल्या, ज्या प्रसंगांचा मी स्वतः साक्षीदार होतो ते जास्तीतजास्त प्रसंग या इतिवृत्तात समाविष्ट करण्याचा मी प्रयत्न केला आहे. तथापि सर्वच प्रसंग यात समाविष्ट झाले आहेत, असा माझा दावा नाही. या इतिवृत्तात पदयात्रेतील अजूनहि काही महत्वाचे प्रसंग, घटना व त्या घटनेशी संबंधित व्यक्तींचे नामोल्लेख राहिले असण्याची शक्यता आहे. यासाठी मी जाणकारांची आधीच क्षमा याचना करतो.

तच्च संस्मृत्य संस्मृत्य, हृष्यामि च पुनः पुनःया भावनेने मी हे इतिवृत्त लिहून काढले आहे. सदर पदयात्रेत पू. अप्पांच्या कृपेने अनुभलेल्या अद्भुत आनंदाचा या निमित्ताने पुनर्प्रत्यय आला, याचे मला अतीव समाधान आहे.

घडली तव स्मरणपूजा, हे काय सौभाग्य अल्प असेअशीच माझी भावना आहे – अरुण परळीकर.

ॐ  श्री  卐               ll श्रीशंकर ll             ॐ  श्री 

महाजनो येन गतः स पन्थाः

पंढरपूर ते सज्जनगड पदयात्रा इतिवृत्त

धरोनि पहा वेष तो मानवाचा l जगी जन्माला अंजनीबाळ साचा ll
जया शोभले नाम हे रामदास l नमस्कार माझा तयांच्या पदास ll
                                              – श्रीदासगणू महाराज.

टाळी वाजवावी गुढी उभारावी l वाट हे चालावी पंढरीची ll

हरिनाम गर्जता नाही भय चिंता l ऐसे बोले गीता भागवत ll

पताकांचे भार मिळाले अपार l गर्जे भीमातीर जयजयकारे ll

खटनट यावे शुद्ध होऊन जावे l दिंडी पिटी भावे चोखामेळा ll

संत चोखामेळा यांनी पंढरपूरच्या वारीचे महत्व वरील अभंगात गायिले आहे. त्यांच्याच प्रमाणे अनेक संतांनीहि पदयात्रेचे वारीचे महत्व वर्णिले आहे. संतांचा हा आदेश मानून प. पू. अप्पांनी आळंदी पंढरपूर, नांदेड पंढरपूर, या पदयात्रांसवे पंढरपूर ते सज्जनगड अशीहि पदयात्रा केली होती. स्वामी वरदानंद भारती (पूर्वाश्रमीचे प्राचार्य अनंतराव आठवले तथा अप्पा) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त श्रीदासगणू महाराज प्रतिष्ठान, गोरटे, विविध उपक्रम राबवित आहे. . पू. अप्पांनी त्यांच्या कार्यकाळात सिद्धीस नेलेल्या अनेक उपक्रमांची पुनरावृत्ती करणे हा त्यातीलच एक भाग आहे. स्वामीजींनी पूर्ण केलेला व प्रतिष्ठानने हाती घेतलेला अजून एक मोठा उपक्रम म्हणजे “पंढरपूर ते सज्जनगड पदयात्रा!

महाभारतातील यक्षप्रश्नच्या प्रसंगी यक्षाच्या को दिक् ?” या प्रश्नाच्या उत्तरादाखल युधिष्टिराने संतो दिक् असे उत्तर दिले आहे, यातील मर्म समजून घेण्यासारखे आहे. ज्या दिशेने संत चालतात ती योग्य दिशा, तीच अनुकरणीय दिशा ! महाजनो येन गतः स पन्थाः ! माणूस प्रकृतिप्रवृत्तिपरिस्थिती प्रमाणे कुठेहि असला तरी त्याचे अंतिम ध्येय मोक्ष, मुक्ति हेच आहे. पात्रता असलेल्या कोणाहि व्यक्तीला याचि देही याचि डोळांमुक्तीचा सोहळा भोगणे शक्य आहे. त्यातले कठीणपण परिस्थितीचे नसून प्रवृत्तीचे आहे. प्रवृत्तीला योग्य ते वळण लावणे हे कोणत्याहि माणसास शक्य आहे, असे आपले शास्त्रकार मानतात. . पू. अप्पांनी हा मुक्तीचा सोहळा सर्वांगाने व परिपूर्ततेने उपभोगून स्वतःच्या जीवनाद्वारे साधकांसाठी एक आदर्श उभा केला आहे. प्रवृत्तीपर सामान्य जनांसारखे त्यांनी जीवन व्यतीत करत असताना सद्गुरू आदेशानुसार व्रतवैकल्ये, जपतप इत्यादींचे निष्ठापूर्वक आचरण करून भाविकभक्तांसाठी असामान्यत्वालाही हेवा वाटेल अशा परमार्थिकदृष्ट्या अलौकिक जीवनाला गवसणी घालण्याचा राजमार्ग आखून दिला आहे. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः। स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते।। (.२१) या गीतोक्ती नुसार सद्गुरूंनी दाखवून दिलेल्या त्या मार्गाने मार्गक्रमण करायला मिळणे ही शिष्यांसाठी परम भाग्याचीच गोष्ट ! त्यांनी आखून दिलेल्या परमार्थिक मार्गावर लौकिकदृष्या त्यांच्याच पाऊलांवर पाऊल टाकून चालण्यापरते दुसरे सौभाग्य ते कोणते ?

पू.अप्पांच्याच काटेकोर नियोजनाच्या कडक शिस्तीत तयार झालेल्या आ. गार्गीताई व श्री. विनायकराव नांदेडकर यांनी त्या नुसार दि. २७ जानेवारी २०१९ ते ०८ फेब्रुवारी २०१९ या दरम्यान “‘पंढरपूर ते सज्जनगडया पदयात्रेची आखणी केली. या कामी त्यांना श्री. विक्रम नांदेडकर यांच्या सह श्री.मोहनराव लिगदे, श्री.अनिल बोर्डे, श्री.सुधीर देशपांडे आणि श्री.विकास व श्री.विलास या कवटीकवार बंधूचे भरीव सहकार्य लाभले. या सर्वांनी सहा ते सात महिने आधी या मार्गाचे सविस्तर सर्वेक्षण केले, पदयात्रींना चालण्याचा जास्त त्रास होणार नाही अशी अंतरे निश्चित केली, त्यानुसार शाळा असेल, मंगल कार्यालय असेल, मंदिरे असतील, भक्तनिवास असतील जशी मिळतील तशी सोयीची मुक्कामासाठी ठिकाणे निश्चित केली. तद्नंतर जिथे मुक्कामाची ठिकाणे निश्चित झाली आहेत त्यांचेशी सतत संपर्क ठेवून समन्वय राखला. या कार्यकर्त्या मंडळींच्या अथक परिश्रमामुळे प्रत्यक्ष पदयात्रा यशस्वीपणे राबविण्यास काहीच अडचण आली नाही. प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री.महेशअण्णा यांचे सुयोग्य मार्गदर्शन वेळोवेळी सर्वांना मिळतच होते.

महाराष्ट्रातील भागवत धर्मियांसाठी वारीचे महत्व अनन्य साधारण आहे. बहुतेक या सर्व वाऱ्या संतांच्या ठिकाणापासून (जसे आळंदी, देहू, पैठण, शेगाव, इत्यादी) पंढरपूरला जातात. मग ही वारी पंढरपूर ते सज्जनगड अशी का? असा प्रश्न काहींच्या मनात उद्भवणे शक्य आहे. ‘पंढरपूर ते सज्जनगडअशी पदयात्रा नियोजण्यामागे पू. अप्पांच्या चिंतनाची फार मोठी बैठक आहे.

श्री दासगणू महाराज व स्वतः पू. अप्पा यांच्या तत्वचिंतनाच्या बैठकीचा समन्वयाद्वैतहा पाया आहे. या संतद्वयीच्या जीवनात असे कितीतरी दाखले आढळून येतात जे या समन्वयाद्वैताच्या विचारसरणीला पुरक व पोषक आहेत. श्री दासगणू महाराजांना सद्गुरू श्री वामनशास्त्री इस्लामपूरकर यांच्या कडून मंत्र दीक्षा मिळाली. शास्त्रीजी स्वतः रामदासी परंपरेचे पाईक असले तरी भागवत ग्रंथाचे निष्ठावान चिंतक होते. श्री दासगणू महाराज (पू.अप्पा हि) सुरुवातीला कट्टर शैव होते तथापि सदगुरु आदेशान्वये त्यांनी वारकरी संप्रदायात रूढ असणारी श्री विठ्ठलाची अनन्य साधारण भक्ती केली. सद्गुरू श्री वामनशास्त्री इस्लामपूरकर रामदासी परंपरेतून आले असल्याने व साधना वारकरी पद्धतीची करीत असल्याने, पू. दादा व पू. अप्पा या दोघांनी वारकरी व रामदासी या दोन संप्रदायात समन्वय राखण्याची भूमिका यशस्वीपणे जीवनभर सांभाळली. वारकरी पद्धतीने साधना करून या उभयतांनी श्री पांडुरंगाच्या भक्तीचा नवा मापदंड प्रस्थापित केला. त्या अनुषंगाने त्यांच्या कडून जे वाङ्मय निर्माण झाले त्या सर्वच वाङ्मयाचे प्राणभूत तत्व म्हणजे समन्वय ! रामदासी परंपरेच्या आधाराने या उभयंत्यांनी श्री विठ्ठलाची इतकी उत्कट भक्ती केली की ज्याच्या फल स्वरूप शैववैष्णव, वारकरीरामदासी हे भेद त्यांच्या पुरते तरी संपूर्णपणे संपुष्टात आले होते. भक्ती उपजली अद्वेष्टी असे उद्गार एकाठिकाणी पू. दादांनी काढले आहेत. या अद्वेष्टीभक्तीच्या फलस्वरूप त्यांच्या कडून जे वाङ्मय निर्माण झाले त्यात त्यांनी प्राधान्यांने विठ्ठलाचीच महती विविध प्रकारे, अनेक अंगांनी गायली आहे. त्यांनी भक्तीरस प्रधान, उत्कट प्रेमाने ओथंबलेली जी अनेक कीर्तने रचली, ज्यात श्रीविठ्ठलाकडे भक्तीत अंतर तुझ्या कधीहि नसावे l मागेपुढे आमुचिया विठू तू असावे llअसे भावपूर्ण मागणे मागितले आहे, त्या सर्व कीर्तनांचा प्रारंभ समर्थांना केलेल्या नमनाच्या रामदास माय माझीयाच पदाने होतो.

परमात्म्यासंबंधी अनुभवास आलेल्या एकरूपतेचे द्योतक म्हणजे श्री दासगणू महाराजांचे खालील पद आहे. हे पद म्हणजे या उभयंत्यांनी अनुभवलेल्या व आचरलेल्या समन्वयाच्या भूमिकेच्या परमोत्कर्षाचे प्रगटीकरणच होय. ते म्हणतात

शैवा जो शिव, वैष्णवा हरि गमे, वेदान्तिया ब्रह्म जो l

बौद्धा बुद्धहि जो, खुदाहि यवना, जैनास अरहंत जो l

कर्ता तोच गमे प्रमाणपटूंना, जे कर्म मीमांसका l

ख्रिस्त्या येशूहि तोच हा, गणू म्हणे ध्या रुक्मिणीनायका ll

असे असूनहि ज्या परंपरेचे ते पाइकत्व सांगतात त्या रामदासी परंपरेच्या प्रवर्तकाप्रती म्हणजेच समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रति असलेला आदर भाव व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या पुढे ते अत्यंत लीनतेने नतमस्तक होतात. या लीनतेच्या उत्कर्षाचेउन्मेषाचे, समन्वयाद्वैत साधण्याच्या उक्ती रूप कृतीचे, रामदासी परंपरेतील सद्गुरु परंपरेला वंदन करण्याचे, हृदयात त्या उज्वल परंपरेविषयी असणाऱ्या परम आदर भावाच्या प्रगटीकरणाचे प्रतीक म्हणजेच ही पंढरपूर ते सज्जनगडवारी ! स्वतः पू.अप्पांनी ४१ वर्षांपूर्वी शके १८९९ मध्ये ही पदयात्रा पूर्ण केली होती. ही पदयात्रा करताना लौकिक व अलौकिक या दोन्ही अर्थाने जो आनंद त्यांनी लुटला तसा आनंद अल्पांशाने का होईना आम्ही लुटू शकलो तर त्यात आमच्या जीवनाची सार्थकता असेल !

तीन वर्षांपूर्वी पौष व., शके १९३७, सोमवार, दि. २५/०१/२०१६ ते फाल्गुन व.१०, शके १९३७, शुक्रवार, दि. १८/०३/२०१६ या दरम्यान १३०० किमी अंतराचा ५४ दिवसांचा गोदा परिक्रमेचा मोठा उपक्रम प्रतिष्ठान तर्फे यशस्वीरीत्या संपन्न करण्यात आला. या परिक्रमेचा प्रदीर्घ कालावधी, प्रदीर्घ अंतरे, बहुतांशी मुक्कामाची गैरसोयीची ठिकाणे, इत्यादी अडचणी लक्षात घेता महिला वर्गाला सोबत घेतले नव्हते. त्यामुळे महिला भाविक वर्ग नाराज होता. पंढरपूर ते सज्जनगड या पदयात्रेत महिलांना सोबत घेण्याचा निर्णय झाल्याने महिला मंडळ अत्यंत आनंदात होते. त्यातहि सेवाभावाचा मूर्तरूप आदर्श असलेल्या आ. गार्गीताई (वसुताई) पदयात्रेत पूर्ण वेळ सोबत राहणार, असे कळल्याने सर्वच भाविकांना आनंद झाला व कधी एकदा पदयात्रा सुरु होते असे झाले. पदयात्रेसाठी ७५ पुरुष व ८५ महिला साधकांनी नोंदणी केली होती. १०१२ भाविक जाऊनयेऊन असायचे. सेवेकरी व इतर मंडळी लक्षात घेता जवळपास १८० लोकं या पदयात्रेत सहभागी झाले होते.

() दि.२६/०१/२०१९, शनिवार = ‘अप्पानिष्ठांची मांदियाळी जमण्यास प्रारंभ.

मुक्काम : श्री गजानन महाराज मठ, पंढरपूर.

काटेकोर नियोजन करून प्रतिष्ठानने पदयात्रेची कार्यक्रम पत्रिका वितरित केली. त्यातील सुचनेप्रमाणे आपापले लागणारे सर्व समान घेऊन सर्व भाविक दि. २६/०१/२०१९, शनिवार रोजी श्री गजानन महाराज मठात जमायला सुरुवात झाली. दुपारी ४ नंतर मठात येण्याच्या सूचना होत्या; त्यास अनुसरून भाविक मंडळी येण्यास प्रारंभ झाला. श्री.विनायकराव, सौ.मुक्ता आत्या व श्री.विक्रम हे सर्व नांदेडकर कुटुंबीय आलेल्या अप्पानिष्ठांच्या मांदियाळीची आस्थेवाईकपणे चौकशी करत होते. स्वतः वसुताई खोल्यांच्या वाटपासाठी बसल्या होत्या. या सर्वांना भेटून व जमलेल्या इतर गुरुबंधूंना पाहून प्रवासातून आलेल्या मंडळींचा शिणवटा क्षणात दूर होऊन चेहऱ्यावर प्रसन्न हास्य विलसत होते. श्री गजानन महाराज मठाचा विस्तीर्ण, निर्मळ व प्रसन्न परिसर सर्वांनाच मोहवीत होता.

श्रीदासगणू परिवारातील प्रत्येक सदस्याला वैयक्तिकरित्या ओळखत असल्याने कोणाला कोणत्या खोलीत, कोणासोबत ठेवायचे याचे वसुताईंचे नियोजन तयार होतेच. त्यानुसार सर्वांना खोलीचे व ओळखपत्राचे वितरण झाले. जसजसे गुरुबंधुंचे आगमन होत होते तसे तसे एकमेकांची भेट घेऊन प्रत्येकाच्या आनंदाला भरते येत होते. दोनच महिन्यापूर्वी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात याच मठात संत पूजन शिबीर संपन्न झाले होते, त्याच्या आठवणींची प्रत्येकजण उजळणी करू लागला. थोडा आराम करून मग मंडळी श्रीरुक्मिणीपांडुरंगाच्या मंदिरात व श्रीदासगणू महाराजांच्या वाड्यावर जाऊन दर्शन घेऊन येत होती. सर्व पदयात्रींना रात्री ०८ वाजता मठातील श्रीराम मंदिरात जमण्याची सूचना देण्यात आली. त्यानुसार सर्व मंडळी ०७५० वाजताच स्थानापन्न झाली.

ठीक ०८ वाजता श्रीविष्णुसहस्रनामाचा पाठ व श्रीवरद नारायण प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर पदयात्रेसाठी जमलेल्या सर्व भाविकांचे श्रीदासगणू महाराज प्रतिष्ठानच्या वतीने श्री.विक्रम नांदेडकर यांनी मन:पूर्वक स्वागत केले व स्वागतपर मनोगत व्यक्त करताना श्रीरामाच्या दासाच्याभेटीच्या ओढीने जमलेल्या भाविकांच्या पदयात्रेचा प्रारंभ श्रीरामाच्या मंदिरातून होत आहे, याचा विशेषत्वाने उल्लेख केला. या समयसूचकतेचे सर्वांनाच मोठे कौतुक वाटले. त्यांनी यावेळी सर्व पदयात्रींना सर्व प्रवासाची कल्पना समजावून सांगितली. नित्याचे कार्यक्रम, घ्यावयाची काळजी, असणाऱ्या गैरसोयी, उद्भवू शकणाऱ्या सर्व प्रकारच्या त्रासाची कल्पना या सर्व बाबी समजावून दिल्या. तसेच पदयात्रेच्या संबंधी काही महत्वाच्या सूचना दिल्या व पदयात्रींच्या शंकांचेहि निराकरण केले.

पहाटे ०५३० वाजता चहा / सकाळी ०६ वाजता प्रार्थना / सकाळी ०६३० वाजता पदयात्रा प्रस्थान / दुपारी ०१ ते ०४ भोजन व विश्रांती / दुपारी ०४ ते ०५ श्रीदासबोध पारायण / दुपारी ०५ ते ०५३० चहा / सांयकाळी ०५३० ते ०७ कीर्तन / सायंकाळी ०७३० ते ०८३० अल्पोपहार / रात्रौ ०८३० ते ०९ श्रीविष्णुसहस्रनाम पाठ असा पदयात्रेचा नित्य कार्यक्रम असेल याची कल्पना दिली. तसेच आवश्यकता पडली तर यात बदल होऊ शकेल, असेहि सांगितले. उद्या सकाळी आवरून ठीक ०६ वाजता पुन्हा श्रीराम मंदिरातच जमण्याची सूचना दिली.

आलेल्या सर्व पदयात्रींच्या भोजनाची व्यवस्थाहि श्रीगजानन महाराज मठातर्फेच करण्यात आली होती. त्यानुसार सर्वांनी जेवणं उरकली व उद्या पासून प्रारंभ होणाऱ्या आनंदयात्रेच्या उत्सुकतेसह सर्व मंडळी निद्रिस्त झाली.

() दि.२७/०१/२०१९, रविवार = पंढरपूर ते उपरी, ता.पंढरपूर.

अंतर १३ किमी / मुक्काम : जि. . प्राथमिक शाळा, उपरी.

जमलेल्या भाविकांचा उत्साह इतका मोठा होता की सकाळी ०६ वाजता प्रार्थनेसाठी जमण्याचा सूचना असताना भाविक मंडळी शुचिर्भूत होऊन श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन कडाक्याच्या थंडीतहि ०५३० वाजताच मठातील श्रीराम मंदिरात स्थानापन्न झाली. काही मंडळी तर भल्या पहाटे श्रीरुक्मिणीपांडुरंगाचेंहि दर्शन घेऊन आली. इतक्या पहाटे व्यवस्थापक मंडळींनी सर्वाना चहा/कॉफी देण्याची व्यवस्था केली. गेले कित्येक दिवस ज्याची आतुरतेने वाट पाहिली तो पदयात्रेचा प्रसंग, ‘श्री वरद नारायणश्री दासगणू महाराजपू. अप्पायांच्या कृपेने सद्गुरूंनी कृतिरूप दाखविलेल्या मार्गावरून प्रत्यक्ष चलण्याचा ‘महद्भाग्याचा योग’ आता काही क्षणावर येऊन ठेपला होता. त्यात आपल्याला प्रत्यक्ष सहभागी व्हायचे आहे याची उत्कंठा शिगेला पोहंचली होती.

ठीक ०६ वाजता प्रातःकालीन प्रार्थनेला सुरुवात झाली. गोरट्यातील सकाळच्या प्रार्थनेतील काही प्रार्थना म्हणण्यात आल्या. त्याचे पत्रक सगळ्यांना वाटण्यात आले. हीच प्रार्थना आता रोज सकाळी म्हणायची आहे. प्रार्थनेनंतर सर्व मंडळी मठाच्या कमानी जवळ जमली. सर्वात पुढे भजनी मंडळ होते. त्यांच्या मागे भगवी पताका धारक, नंतर पुरुष भाविक व त्यामागे महिला भाविक अश्या दोनदोन व्यक्तींच्या रांगा करून पदयात्री शिस्तीत उभे होते. भजनी मंडळाने नमनाचे अभंग म्हणण्यास प्रारंभ केला. “सुंदर ते ध्यान“, “रूप पाहता लोचनीहे अभंग प्रत्यक्ष पंढरपुरात ऐकताना अंगावर रोमांच व डोळ्यात अष्टसात्विक भाव दाटून येत होते. त्यानंतर ज्ञानोबातुकारामच्या गजरात पावलीचा सोहळा रंगला. भजनानंदात दंग होऊन पावली खेळताना अंग मोहरून येत होते. असे वाटत होते की हा क्षण, ही वेळ येथेच थांबून राहावी, इतका आनंद त्या भजनातून प्राप्त होत होता. “न लोभ दुसरा घडो गुरु परंपरा रक्षणया पू. अप्पांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी असा ध्येयप्रेरित व एकसंघ शिष्यपरिवार पाहून पू. अप्पांना किती आनंद झाला असता, या विचाराने सौ.मुक्ता आत्याला व आ.वसू ताईंना पू.अप्पांची तीव्रतम आठवण येत असावी. त्यामुळे हा सोहळा पाहताना त्यांना प्रेमाचे भरते यऊन तो प्रेमरस त्यांच्या नयनातून अखंडपणे स्रवत होता.

त्यानंतर श्री.विनायकराव नांदेडकर यांनी वीणेचे व वीणाधारकाचे विधीवत पूजन केले व सकल संतांचा जयघोष करत श्रीपांडुरंगाच्या नगरीतून, श्रीगजानन महाराजांच्या आशीर्वादाने, ‘श्रीवरद नारायणश्रीदासगणू महाराजपू.अप्पायांच्या कृपेने पदयात्रा मार्गस्थ झाली. भजनाच्या गजरात भाविकांची पावले वाट आक्रमू लागली. श्री गजानन महाराज मठाच्या बाहेर आल्या नंतर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा लागला, तेव्हा तिथे सर्वांनी संतांच्या जयघोषासोबत छत्रपतींचाहि मोठ्या आवाजात जयघोष केला. हिंदू समाजाचा एक घटक म्हणून आज जी ही पदयात्रा आपण काढू शकतो; त्यास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करण्याचे कर्तृत्व श्री ज्ञानेश्वर / श्री तुकाराम / श्री रामदास यांसारख्या संतांचे तर आहेच; तितकाच वाटा शिवशंभू या छत्रपतींचाहि आहे. याची प्रत्येकाची हृदयात असलेली आदरयुक्त जाणीव त्या जयघोषातून प्रगट होत होती. त्या पुतळ्याला उजवे घालून दिंडी श्रीरुक्मिणीपांडुरंगाच्या मंदिराच्या दिशेने गेली.

झुंजमुंज असणारी पहाटेची वेळ, पक्ष्यांचा किलबिलाट, अंधुक होत जाणारा रात्रीचा काळोख, उजळू पाहणारी पूर्व दिशा, व्यापाऱ्यांची दुकाने उघडण्याची लगबग, वारकऱ्यांची दर्शनासाठी चाललेली धावपळ अशा या प्रसन्न सकाळच्या वेळी, सकल संतांचे माहेर असलेल्या पंढरीतून, पथदिव्यांच्या प्रकाशात, मुखाने विठ्ठलनामाचा, जयघोष करीत आमची दिंडी मंदिराला प्रदक्षिणा घालू लागली तेव्हा एक वेगळेच अव्यक्त, अनामिक व आनंददायी चैतन्य प्रत्येकाच्या अनुभवास येत होते. मंदिराच्या मुख्य द्वारासमोर आल्यानंतर प्रत्येकाने श्री पांडुरंगाला मनोभावे प्रणिपात केला. प्रत्येकाने चंद्रभागेचे स्मरण केले, संत चोखामेळा यांचे दर्शन घेतले व श्री नामदेव पायरीला नमन केले. श्री पांडुरंगाचा व रुक्मिणी मातेचा आशीर्वाद घेऊन, मंदिराला उजवे घेऊन दिंडी पुढे मार्गस्त झाली. भागवताचार्य श्री. वा. ना. उत्पात आपल्या घराबाहेर दिंडीला निरोप देण्यासाठी उभे होते. इतक्या मोठ्या संख्येने पदयात्रींना पाहून त्यांचाहि उर भरून आला.

दिंडी पुन्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आली तेव्हा श्री.विनायकराव व सौ.मुक्ता आत्या यांच्या चेहऱ्यावर विषण्णतेची छटा आता स्पष्टपणे दिसत होती. कारण वयोपरत्वे आलेल्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना पुढे १२ दिवस चालणाऱ्या या आनंदयात्रेत सहभागी होता येणार नव्हते, ही हुरहूर त्यांच्या उरी दाटून आली होती. त्यामुळे पदयात्रींना निरोप देताना या उभयंत्यांना जड जात होते. सर्व दिंडी तेथून पुढे गेल्यावरहि ती दोघे किती तरी वेळ दिंडी दृष्टीआड होई पर्यंत निःशब्द, स्तब्धपणे तिथे उभी होती.

एव्हाना आता बऱ्यापैकी उजाडले होते. संतांच्या अभंगांचे गायन करीत दिंडीचे मार्गक्रमण सुरु झाले. तशी भजनकरी मंडळीची चाल वेगातच असायची. त्याच्या समवेत सर्वांनाच चालणे शक्य व्हायचे नाही. तेव्हा मग ते पदयात्री श्रीविष्णुसहस्रनामाचा पाठ म्हणत, श्री ज्ञानदेवांचा हरिपाठ म्हणत, भजनं म्हणत, नामस्मरण करीत, विविध स्तोत्रे म्हणत, स्वतःच्या मोबाईलवर कीर्तने / भजनं ऐकत मार्गक्रमण करायचे. चालताना हाताशी असलेला वेळ रिकामा न दवडता, प्रत्येकजण काही ना काही देवाचे नाव घेतच वाटचाल करीत होता; ही निश्चितच खूप मोठी गोष्ट आहे. पू. दादा व पू. अप्पांनी केलेल्या संस्काराचे हे फलित आहे. भाविकांचे हे नामस्मरण सज्जनगडला पोहंचे पर्यंत चालू होते, हे आनंदाने नमूद करावेसे वाटते. “हरि भजनाविण काळ घालवू नको रेया संत सोहिरोबा यांच्या वचनाचे स्मरण यानिमित्ताने होत होते.

०८३० च्या सुमारास पदयात्रा वाखरी जवळ पोहंचली असता व्यवस्थापकीय मंडळींनी न्याहारी साठी थांबण्याची सूचना केली. एक छोटे पण प्रशस्त आवार असलेले मारुती मंदिर पाहून पदयात्री विसावले. तिथेच सर्वांना गरमागरम नाश्ता पुरविण्यात आला. नाश्ता घेऊन ताजेतवाने झालेले पदयात्री पुन्हा मुखाने नामस्मरण करीत पायाने आपला मार्ग क्रमू लागले. वेगाने चालणाऱ्या दिंडी सोबत पदयात्री १०३० वाजताच मुक्कामाच्या ठिकाणी पोहंचले. तदनंतर आपापल्या चालीने चालत मंडळी जास्तीतजास्त दुपारी १२ वाजे पर्यंत उपरीच्या शाळेत पोहंचली. पहिलाच दिवस असल्याने सर्वच मंडळी थकली होती. तशी शाळा लहान व जागा अपुरीच होती. पण पदयात्रींचे तिकडे लक्षच नव्हते. भोजनाला अजून थोडा अवकाश होता. तेव्हा जागा मिळेल तिथे मंडळी आराम करत पडली. ०१ वाजता भोजनासाठी पुकारा झाला. चालूनचालून भूक लागली होतीच, त्यात आ.वसू ताईंच्या निगराणीखाली सिद्ध झालेले सुग्रास जेवण भरपेट मिळाले. यामुळे पदयात्रींचा चालायचा थकवा लगेचच दूर झाला. भोजनाच्या वेळी श्लोक म्हणण्याची चढाओढ असायची. तीन पंक्तीत सर्वांची भोजनं झाली. भोजनानंतर मंडळी पुन्हा आराम करू लागली.

आवश्यक तेवढी विश्रांती घेऊन मंडळी ठीक ०४ वाजता ग्रंथराज श्रीदासबोधाच्या परायणाला शाळेच्या मोकळ्या पटांगणात जमा झाली. पारायणासाठी भाविकांना श्रीदासबोध ग्रंथ आणण्यासाठी सूचना दिलेली होती. बहुतेक सर्वांनी आपापले ग्रंथ आणले होते. काही कारणाने कोणाला आणायला जमले नाही, त्यांच्यासाठी म्हणून गोरट्याहून १० ग्रंथ आणले होते. या सर्वांचा उपयोग झाला. श्री दासगणू महाराजांनी रचलेले श्रीसमर्थाष्टकसामुदायिक सुरात म्हणण्यात आले व परायणाला प्रारंभ झाला. .वसू ताई मोठ्याने वाचन करीत व त्यांच्यासवे इतर सर्वजण मनातल्या मनात वाचन करीत. तथापि आ.वसू ताईंचे वाचन इतके गतीमान असायचे की, आमच्याकडून एखादी ओळ निसटली की त्यांच्या वचना सोबत येण्यासाठी आमची धांदल उडायची. त्यामुळे पूर्ण लक्ष देऊनच आम्हाला वाचन करावे लागायचे. असे पारायण रोज ०१ तास चालायचे. पदयात्रेत दररोज रात्रीच्या पाठानंतर स्वामी वरदानंद भारती यांनी रचलेले श्रीसमर्थ रामदासस्तव:म्हणले जायचे.

पंढरपूरातून आमची दिंडी मंदिराला प्रदक्षिणा करून मार्गस्त होत असताना ०३ श्वान आमच्या सोबत चालू लागले. त्यापैकी एक मागे राहिला पण दोन श्वान उपरीच्या मुक्कमापर्यंत आमच्या समागमे आले; याचे सर्वांनाच मोठे कौतूक वाटत होते. या दोघांचे काही पूर्वसुकृत असेल, ज्यामुळे त्यांना आमच्या सोबत येण्याची सुबुद्धी झाली. ती.दादांनी जेव्हा प्रथमतः गोदापरिक्रमा केली होती, त्यावेळी सर्व परिक्रमा पूर्ण होई पर्यंत असाच एक श्वान (ज्याचे गंग्याअसे नाव ठेवले होते) त्यांच्या सोबत असायचा, असे वाचले होते. त्या आठवणीची प्रत्यक्ष अनुभूती आम्ही अनुभवत होतो.

आज आमची दिंडी उपरीला पोहचली असता आमच्यासवे आलेले ज्येष्ठ गुरुबंधू श्री.मुरलीधरराव (कारभारी) देशपांडे हे परत जायला निघाले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना खरेतर पंढरपूर ते उपरी चालणेहि शक्य नव्हते. पण एव्हढा सोहळा होतो आहे, त्याचा काही अंशाने का होईना आपण आस्वाद घ्यावा या हेतूने ते उपरी पर्यंत आले. तेथून परत जाताना त्यांचा पाय निघत नव्हता. आईला सोडून नव्याने शाळेत जाणारे मूल जसे कानकोंडे होते, तशी त्यांची अवस्था झाली होती.

आज सौ. मीराताई शेंडगे यांचे कीर्तन झाले. त्यांनी श्री ज्ञानेश्वर भाग १ हे आख्यान छान सांगितले. आख्यानातील प्रसंगांशी त्या एकरूप होऊन सांगत होत्या, त्यामुळे कीर्तन छान झाले. रात्रीच्या अल्पोपहारानंतर जिथे जागा मिळेल तिथे मंडळी विसावली. दिवसभराच्या थकव्यामुळे निद्रादेवीहि पदयात्रींवर लगेचच प्रसन्न झाली.

रात्री उशिरा काही कारणाने मला जाग आली. पहातो तर काय, श्री.गंगाधर गोडगे हे खुर्चीत जागे बसले होते. मी विचारले, “का नाही झोपलात ?”. “शाळेचे मोकळे आवार आहे, आपले सर्वांचे समान बाहेरच आहे, सुरक्षा काही नाही, त्यामुळे मी पहारा देत जागा आहे. पहारा देण्यास ताईंनी सांगितले आहे“, असे म्हणाले. उगाच उपक्रम यशस्वी होत नाहीत ! किती बाजूने विचार करावा लागतो ! एखादा उपक्रम यशस्वी होण्यासाठी जसे आ.वसू ताई सारख्या योग्य योजकाची गरज असते, तसे ती योजना नीटपणे राबविणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचीहि अत्यंत गरज असते, हे श्री.गंगाधर यांना पाहून मला उमजले.

(उर्वरित वृत्तांतासाठी भाग क्र. २ पहा)