ॐ श्री 卐
ll श्रीशंकर ll
पंढरपूर – सज्जनगड पदयात्रा
(ओवीबद्ध वर्णन)
नमन करुन गणेशासी । तसेच माता शारदेसी ।
आधुनिक महिपती दादांसी । वंदन करितो प्रथमत: ॥१॥
तसेच ज्ञानोबा तुकोबासी। साई सद्गुरु समर्थासी ।
आरंभ करितो लेखनासी । स्मरुन चित्ती सद्गुरुला ॥२॥
त्यांच्या कृपेवाचून । हे काव्य न होईल पूर्ण ।
म्हणोनी त्यांना वंदन असो माझे पुन:पुन्हा ॥३॥
अप्पांनी जे जे केले । त्यास अनुसरण्यासी भले ।
पदयात्रेसी आयोजिले । पंढरपूर सज्जनगड ॥४॥
श्रद्धा ठेवून अंतरी । सद्गुरूंच्या चरणावरी ।
चालता प्रगती होई खरी । ती अध्यात्म मार्गाची ॥५॥
हा सिध्दांत ध्यानी धरुनि । निष्ठा ठेवून सद्गुरुचरणी ।
दासगणु प्रतिष्ठाननी । आयोजिली ही पदयात्रा ॥६॥
यात्रा आरंभ होताना । विनायक काका तसे वा.ना. ।
मुक्ताआत्या पदयात्रींना । निरोप देती पंढरीत ॥७॥
पदयात्रेस आरंभ झाला । प्रदक्षणा करुन विठोबाला ।
भाविक गाती भजनाला । उच्चस्वरे आनंदे ॥८॥
टाळ मृदंगे भरिला रंग । पदयात्री भजनात दंग ।
स्वच्छंद गाती अभंग । श्रीज्ञानोबा तुकोबांचे ॥९॥
तयी एक अघटित घडले । दोन श्वान सामिल झाले ।
पदयात्रेमाजी भले । नवल वाटे सर्वांना ॥१०॥
अप्पांसवे चालण्याची । इच्छा पूर्वजन्मीची ।
अपुरी जी राहिली साची । पूर्ण जणु करिती ते ॥११॥
किंवा घेऊन हनुमंतासी। प्रभू चाले पदयात्रेसी ।
समर्थाच्या भेटीसी । निघाले की प्रभू–भक्त ॥१२॥
अशी धारणा अनेकांची । होई चालता भाविकांची
मुक्कामाच्या स्थानाची । राखण करिती रात्रंदिन ॥१३॥
प्रात:काळी भजनकरी । दिंडी निघता सामोरी ।
श्वान रांगे बरोबरी। चालती की सर्वांसवे ॥१४॥
या पदयात्रे भीतरी । दीडशेवर नर नारी ।
विक्रमदादाही बरोबरी । चालती पदयात्रींच्या ॥१५॥
गोरटे, नांदेड, परभणीचे । कोकलेगांव, मुखेड, पुण्याचे ।
संभाजीनगर, बीड, उमरीचे । होते लोक सहभागी ॥१६॥
ताईंच्या नेतृत्वाखाली । यात्रा ही आरंभ झाली ।
सहवासाने आनंदली । भक्तमंडळी ताईंच्या ॥१७॥
वसुताईंचे नियोजन । लिगदे, बोर्डे साथीजन ।
विमल, सविता, भगिनीजन । करिती सेवा यात्रींची ॥१८॥
प्रतिदिनीचे दूध, पाणी । व्यवस्था केली शिवाजीनी ।
कवटिकवार बंधुंनी । कामे केली पडेल ती ॥१९॥
श्रमाची ना तमा त्यांना। झटती प्रत्येक कामांना ।
प्रत्येकजण जेवला ना । याकडे लक्ष त्यांचे ॥२०॥
राजू , सूर्यकांत ,लखन । जे होते चालकजन ।
अलिप्त न राहिले यात्रेतून। कामे करिती पडेल ती ॥२१॥
मीठ चटणीपासून तयारी । कुठे कोणत्या कोशिंबिरी ।
भोजन तसेच न्याहारी । होते सारे नियोजन ॥२२॥
पदयात्रींना भोजनाची । मेजवानीच होती साची ।
प्रतिदिनीच्या पदार्थांची । यादीच होती ताईकडे ॥२३॥
गुरुवार असो वा एकादशी । शनिवार अथवा चतुर्थीसी ।
न्यून नव्हते फराळासी । वाटे आज द्वादशीच ॥२४॥
उपमा, पोहे, दलिया, उसळी । पुरीभाजी, सुशिला, इडली।
कुठे श्रीखंड, जिलबी केली । ठेचा कुठे चवीला ॥२५॥
काम भाजी चिरण्याचे । विक्रम,विकास करिती साचे।
आडसूळ, वतनी, विलासाचे। कौशल्य दिसे त्या ठाई ॥२६॥
स्वप्नील, दिपकही सामिल । या सर्वांचे कौशल्य ।
जो जो भाजी खाईल। तो तो त्यासी वर्णितसे ॥२७॥
पुरीभाजी दलियाची । तसेच प्रत्येक पदार्थाची ।
रत्नमाला सुगरणीची । चव होती स्वयपाका ॥२८॥
त्यामुळे पदयात्रींचे । श्रम पायी चालण्याचे ।
जाती सवे भोजनाचे । तयार होती पारायणा ॥२९॥
गाता संतांची वचने । एकामागून एकाने ।
दीपकच्या अखंड श्लोकाने । पंगत वेगळी भासतसे ॥३०॥
प्रार्थना, पारायण, कीर्तन । चालताना होते भजन ।
कुणी रामनामी चिंतन । करीत चाले पथासी ॥३१॥
मोठया मुक्कामी चालताना । श्रम होती पायांना ।
होती पायात वेदना । निद्रा ना सहज येई ॥३२॥
ताईंच्या मातृप्रेमाने । श्रम जे होती चालण्याने ।
ते सहजची होती उणे । बोलता एका शब्दाने ॥३३ ॥
ज्यास वेदना असह्य होती । त्यास झंडुबाम साथी ।
वरवरच्या उपचाराप्रति । करणे लागे दैनंदिन ॥३४॥
या झंडुबाम वासे भली । अनेकांची सर्दी गेली ।
तयासी ना गरज पडली । वेगळी औषधे घेण्याची ॥३५॥
ह्या वेदना जरी होती । पायी चालता फोड येती ।
तरी आनंद होता चित्ती । सद्गुरु मार्गी चालण्याचा ॥३६॥
मार्गक्रमण करताना । भजनी गाती भजनांना ।
पाय धरिती ठेक्यांना । चालता टाळ मृदंगाच्या ॥३७॥
नाष्टा सर्वांना मिळावा । वंचित कुणी न रहावा ।
पाण्याचाही पुरवठा व्हावा । लिगदेकाका लक्ष देती ॥३८॥
यात्रा चालता पथानी । कुठे नाष्टा कुठे पाणी ।
परळीकर लिगदे काकांनी । नियोजनासी लाविले ॥३९॥
मिराताई चौधरींनी । भारुडा सादर करोनी ।
गाऊन विविध गौळणी । नाचविले पदयात्रींना ॥४०॥
यात्रेत साधनाताईंनी । तसेच आनंदागुरुजींनी ।
भारुडा साथ देऊनी । अभिनय केला गोपींचा ॥४१॥
भजन ज्ञानोबा तुकोबाचे । शंकर गाई मुक्त वाचे ।
फेर धरुन समूह नाचे । आनंदाच्या लहरीमध्ये ॥४२॥
नाचता विसरती देहभान । फुगड्या खेळती पथातून ।
तरुण तसेच वृद्धजन । आपापल्या जोडीसवे ॥४३॥
ज्यांनी न आणिली अर्धांगिनी । खेद वाटे त्यांच्या मनी ।
संधी गेली निघोनी । जोडीसवे खेळण्याची ॥४४॥
चित्रे पाहता यात्रेची । भूस्वर्गीच्या आनंदाची ।
भावना होई गमावल्याची । दुर्मिळशा या क्षणाला ॥४५॥
विक्रमदादांचा प्रथम गट । जातसे मुक्कामी थेट ।
चालतांना मध्ये वाट। थांबती ना कधी ते ॥४६॥
वृद्ध चालती कष्टाने । परी न येती वाहनाने ।
तरुणा पडली बंधने । पाय दुखती म्हणण्याची ॥४७॥
पदयात्रेत चालताना । मध्येच करुन विनोदांना ।
चालून झालेल्या श्रमांना । लिगदे काका निवविती की ॥४८॥
या पदयात्रे भीतरी । लोक होते नाना परी ।
काही खोडकर स्त्रिया भारी । ऐकती ना कवणाचे ॥४९॥
रात्री संगीत घोरण्याचे । कुणा न राही भान त्याचे ।
गाठोडे तसेच सामानाचे । राखे हनुमंत जांबुवंत ॥५०॥
तेच दोन श्रोते होते । या संगीत मैफिलीते ।
कारण निद्रेने सकलाते । वश केलेले असे की ॥५१॥
गोरठयाचे जे सेवेकरी । होते यात्रे माझारी ।
पदयात्रींची सेवा भारी । केली की रात्रंदिन ॥५२॥
पहाटे करिती गरमपाणी । स्नान कराया लागुनी ।
सामानाच्या बॅगांनी । गाडी भरिती प्रतिदिन ॥५३॥
मिराताई शेंडगेंचे । कीर्तन झाले उपरीत साचे ।
आख्यान ज्ञानेश्वरांचे । गाईले की तयांनी ॥५४॥
महाराष्ट्रातील संतांची । महती दादा अप्पांची ।
वर्णिली पूर्वरंगी साची । त्या दिनीच्या कीर्तनात ॥५५॥
पुढे तांदुळवाडी स्थानी । कीर्तन विक्रम दादांनी ।
बालपणीच्या आठवणी । जागृत केल्या अप्पांच्या ॥५६॥
पिलीव ग्रामी यात्रा येता । गाईली नामदेव चरित्रगाथा ।
संतजीवनाची सार्थकता । वर्णन केली दादानी ॥५७॥
पारायणात एके दिनी । धुळदेव खंडोबा संस्थानी ।
दोन कपि बसले येऊनी । श्रवण करण्या दासबोध ॥५८॥
मिराताईंनी तुलसींचे । चरित्र गाईले तेथ साचे ।
वर्णन रामलीलेचे । केले कीर्तनी त्यादिनी ॥५९॥
ताईंनी म्हसवड मुक्कामात । कीर्तन केले प्रेमभरित ।
विवेका स्थान जीवनात । किती तेही वर्णिले ॥६०॥
बोधले बुवांचे आख्यान । ताईंनी केले तेथ जाण ।
भक्त प्रेमा गाऊन । कीर्तन सांग केले की ॥६१॥
गोंदवल्याच्या संस्थानात । स्वच्छता पावित्र्य ओतप्रोत।
गोशाळाही आवारात । तसेच भव्य इमारती ॥६२॥
संत वास्तव्याचा महिमा । तेथ कळला लोकांना ।
घेती समाधीच्या दर्शना । मिळे शांती जयाने ॥६३॥
तेथे विक्रम दादांचे । आख्यान झाले गोरोबाचे ।
दादांच्या संक्षिप्त वर्णनाचे । कौशल्य लोक वाखाणती ॥६४॥
श्रीनारायण जय नारायण । ताई गाती मधुर भजन ।
भाविक नाचती फेर धरुन । ताईसवे आनंदे ॥६५॥
श्रम सारे विरुन जाती । ताई जेव्हा भजना गाती ।
पाऊली सर्वासवे खेळती । मोठेपणा विसरुन ॥६६॥
ताईसवे राहण्याचा । लाभ ज्यांना झाला साचा ।
अनेक गोष्टी शिकण्याचा । योग आला तयांना ॥६७॥
पथी महिला सुस्वर गाती । मधेच कुणी फेर धरिती ।
काल्याचे खेळ खेळती । कुणी पथी चालतांना ॥६८॥
नवखे लोक पाहुन होती । चकित, कुणी साथ देती ।
आपणही सहभागी होती । भक्तिप्रेमा दाटून ॥६९॥
भजन, भारुड गायनाने । शंकरच्या ज्ञानोबा तुकोबाने ।
फुगडी, पाऊली, हमामाने । वेड लाविले यात्रींना ॥७०॥
गोरटयाच्या महिलांनी । प्रथमची सहभागी होऊनी ।
भजना गाऊन पथानी । पूर्ण केली पदयात्रा ॥७१॥
निढळ मुक्कामी कीर्तनाचा । मजसी योग आला साचा ।
गाईला सद्गुरु चरित्राचा । भाग संक्षिप्त रुपाने ॥७२॥
ताईंच्या कर्तव्यदक्षतेची । तसेच काटेकोरपणाची ।
प्रचिती आली यात्रेत साची । निर्णय अनेक घेतांना ॥७३॥
काचरे काका प्रतिदिनी । थांबून सूर्योदय स्थानी ।
न विसरता आठवणीनी । प्रार्थना घेती गभस्तीची ॥७४॥
यात्री जोडून आपुल्या करा । नित्य गाती या स्तोत्राला ।
प्रसन्नता ये चित्ताला । या स्तोत्र गायनाने ॥७५॥
सकाळच्या या समयासी । गाऊन नारायण प्रार्थनेसी ।
वंदन करुन भास्करासी । मार्गक्रमणा करिती ते ॥७६॥
रचना या स्तोत्राची । अप्पांनी जी केली साची ।
प्रतिदिनी एका श्लोकाची । नांदेड–पंढरी यात्रेत ॥७७॥
पुसेगावच्या भोजनात । इडली होती जेवणात ।
चवीने सर्व होते खात । कौतुक करुन ताईंचे ॥७८॥
इनामदार काकांनी । पुसेगावच्या कीर्तनी ।
रामदास चरित्र गाऊनी । सादर केली सेवा तिथे ॥७९॥
पदयात्रींनी विठोबाचे । प्रातिनिधिक स्वरुपाचे ।
प्रतिक रुक्मिणी विठोबाचे । करुनि लग्न लाविले ॥८०॥
प्रातिनिधिक या विवाहाने । आनंदली सकल मने ।
सेंदूरवाडकर जोडीने । पुनरानुभव की घेतला ॥८१॥
रेणापुरकर महाराजांनी । नरहरी चरित्र गाऊनी ।
कोरेगावच्या मुक्कामी । भक्तिप्रेमा जागविले ॥८२॥
ध्वज जयांनी स्कंधी धरिले । त्यांनी ते शेवटा नेले ।
पथी चालता नाचविले । धरुनी ठेका मृदंगाचा ॥८३॥
गोरट्याचे भजनी मंडळ । जयासी ना काळ वेळ ।
अखंड नामाचा कल्लोळ । चालता गाती आनंदे ॥८४॥
रावसाहेबांच्या गायनाने। महिलांच्या मधुर भजनाने ।
बरबडेंच्या मृदंगाने । भक्तिडोही डुंबविले ॥८५॥
कोंडीबा मामांच्या उड्यांनी । नागनाथ मामांच्या गिरकीनी ।
मधुनच होणाऱ्या घोषणांनी । उत्साह भरे भजनात ॥८६॥
सातारा मुक्काम स्थानी । कीर्तन केले ताईंनी ।
भक्तिमार्गीच्या गोष्टींनी । पूर्वरंग रंगविला ॥८७॥
मिराबाईचे आख्यान । मंजुळ स्वरे गाऊन ।
कृष्णमूर्तीचे लबाडपण । सर्वासमोर आणिले ॥८८॥
मुक्कामाच्या ठिकाणी । त्या स्थानच्या मालकांनी ।
सर्वा अतिशय प्रेमानी । सहाय्य केले स्वेच्छेने ॥८९॥
लिगदे बोर्डे काकांनी । फुलाचे पाकळी म्हणोनी ।
प्रेमाची भेट देऊनी । सत्कारिले सर्वांना ॥९०॥
बोर्डे काका यात्रेचे । होते खजिनदार साचे ।
प्रतिदिनीच्या खर्चाचे । टिपण घेती कटाक्षाने ॥९१॥
यात्रा येता सांगतेला । ऊर सर्वांचा गहिवरला ।
बारा दिवस गेलेला । काळ न कळला कवणासी ॥९२॥
महेशअण्णा जरी का असते । सहभागी या पदयात्रेते।
पदयात्रींच्या आनंदाते । भरते आले असते की ॥९३॥
प्रकृती अस्वास्थ्या करणे भली । जरी पदयात्रा ना घडली।
परी मानसयात्रा केली । अण्णांनी त्यासमयासी ॥९४॥
घार हिंडे आकाशी । चित्त तिचे पिल्लापाशी ।
तशीच अवस्था काहिशी । होती तयी अण्णांची ॥९५॥
परळी मुक्कामी यात्रा येता । सज्जनगडासी टेकिती माथा ।
समर्थ तुम्हीच चढवा आता । कठीणशा या गडावरी ॥९६॥
समर्थ असता पाठीशी । काय अशक्य आम्हासी ।
असा निश्चय मानसी । करुन चालती पदयात्री ॥९७॥
ज्या स्थानी कल्याणांनी । उडी मारिली छाटीकारणी ।
तेथे शीर नमवुनी । पुढे निघाले पदयात्री ॥९८॥
गाता प्रभूच्या नामाला । घाट तोही संपून गेला ।
भगवंताचीच ही लीला । वाटे जणु प्रत्येका ॥९९॥
भक्तिमय तो गड सारा । मंद मंद वाहे वारा ।
पवित्रशा त्या परिसरा । पद लागले समर्थांचे ॥१००॥
दर्शन घेता समर्थांचे । श्रम विलया गेले साचे ।
जयघोष अखंड करिती वाचे । जय जय रघुवीर समर्थ ॥१०१॥
काल्याच्या पूर्वसंध्येला । विक्रमदादाने सांगितला ।
संतसखूचा महिमा भला । कीर्तनात गडावरी ॥१०२॥
काला कीर्तना आरंभ झाला। आठविता सद्गुरु कृपेला ।
तयी विक्रम दादाला । गहिवर झाला अनावर ॥१०३॥
बोल न निघती मुखानी । सद्गुरु प्रेमा दाटला मनी ।
भावनांना अश्रूंनी । वाट दिधली ते ठायी ॥१०४॥
कथुनी गोपिंच्या प्रेमाला । मुखी गाईल्या कृष्णलीला।
आली जयी खेळ वेळा । उत्साह भरे यात्रीत ॥१०५॥
खेळण्यासी आरंभ झाला । प्रथम खेळुया फुगडीला ।
कोण येतो खेळण्याला । वदती दादा कीर्तनात ॥१०६॥
ताईंनी खोचले पदराला । मी खेळते फुगडीला ।
दुर्मिळ असा योग आला । वाटे सर्वा मानसी ॥१०७॥
ताईंनी फुगडी खेळली । वय विसरुन त्यावेळी ।
विक्रम दादासह भली । विस्मय वाटे सर्वांना ॥१०८॥
शक्ति ही सद्गुरुंची । तसेच त्यांच्या तपस्येची ।
अन्यथा ना घडावयाची । गोष्ट ऐशी विबुध हो ॥१०९॥
जो तो येई खेळण्याला । परी राखून मर्यादेला ।
संकल्प गेला पूर्णतेला। सांगता केली काल्याची ॥११०॥
प्रयोजन या यात्रेचे । होते मुळी आगळे साचे ।
साध्य करण्या आध्यात्माचे । ध्येय आपुल्या परीने ॥१११॥
परंपरा चालवावया । पूजन संतांचे कराया ।
स्वार्थीपणासी टाकाया । मिळे की या यात्रेत ॥११२॥
वचने गाऊन अप्पांची । रचना तैशी तुकोबाची ।
दादांच्या त्या काव्याची । नंदादीप असती जे ॥११३॥
दर्शन घेण्या संताचे। भारताच्या विविधतेचे ॥
रमणीय सज्जनगडाचे । तीर्थक्षेत्र जे महाराष्ट्री ॥११४॥
जे जे यात्रेत सहभागी झाले । त्यांनी परमानंदा मिळविले ।
जणु सार्थकी लाविले । आयुष्याच्या क्षणासी ॥११५॥
मी न पूर्ण यात्रा केली । पदयात्रींच्या अनुभवे भली ।
काव्याची या रचना झाली। सद्गुरुकृपे नि:संशय॥ ११६॥
काही ठिकाणी एकेरीत । आला उल्लेख लेखनात।
काव्य नियमांच्या बंधनात । राहून करिता लेखनासी ॥११७॥
सर्वांसी हाथ जोडूनी । क्षमा याचना करुनी ।
पदयात्रींसी वंदूनी । लेखनासी थांबवितो ॥११८॥
हेतू या लेखनाचा । होता रामदासाचा ।
यात्रेत सहभागी होण्याचा । या काव्य रुपाने ॥११९॥
तो आज पूर्ण झाला । वाहून सद्गुरु चरणाला ।
या काव्यरुप सुमनाला । विराम देतो काव्यासी ॥१२०॥
पदयात्रा ऐशापरी । जीवनी घडो वरचेवरी ।
हीच विनती अत्यादरी । करितो श्री पांडुरंगा ॥१२१॥
रचयिता : रामदास सुदाम टेकाळे.
गोरटे, ता.उमरी, जि.नांदेड.
मो. ८८३ ०६१ ३३०८
ॐ श्री: 卐 ॐ श्री: 卐 ॐ श्री: 卐ॐ श्री: 卐 ॐ श्री: 卐 ॐ श्री: 卐ॐ श्री: 卐 ॐ श्री: 卐 ॐ श्री: 卐
ॐ सर्वेशां स्वस्तिर्भवतु ।
सर्वेशां शान्तिर्भवतु ।
सर्वेशां पुर्णंभवतु ।
सर्वेशां मङ्गलंभवतु ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
ॐ श्री: 卐 ॐ श्री: 卐 ॐ श्री: 卐ॐ श्री: 卐 ॐ श्री: 卐 ॐ श्री: 卐ॐ श्री: 卐 ॐ श्री: 卐 ॐ श्री: 卐