ॐ  श्री  卐

ll श्रीशंकर ll

श्रीदासगणू महाराजांचा अधिकार उभ्या महाराष्ट्राला कळला होता. श्रीदासगणू महाराजांचा सत्कार करून त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करावा, असे सगळ्यांनाच वाटत होते. त्यादृष्टीने नांदेड, पंढरपूर, पुणे येथील स्नेहीजनांनी व शिष्यमंडळींनी निरनिराळ्या वेळी, निरनिराळ्या निमित्ताने सत्काराच्या योजना आखल्या. त्याची तयारीहि सुरु केली. परंतु स्वतःचा असा सत्कार करून घेण्याची कल्पना श्रीदासगणू महाराजांना कधीच प्रशस्त वाटली नाही. श्रीज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायामध्ये ‘अमानित्वम्, अदंभित्वम्…’ या ज्ञानलक्षणाचे वर्णन करीत असताना जे लिहिले आहे त्याचा प्रत्यय श्रीदासगणू महाराजांच्या जीवनात अनेक प्रकारे येत होता. हे त्यांच्या जीवनाचे व परमार्थ मार्गातील तपश्चर्येच्या सिद्धीचे सहज स्वरूप होते. त्यामध्ये कोणतीहि कृत्रिमता नव्हती वा जाणीवहि नव्हती. याच वैशिष्ट्यामुळे त्यांचे सत्कारसमारंभ, अनेकांची इच्छा असूनहि कधी कार्यवाहीत आले नाहीत. पण पुण्यश्लोक अहिल्यानगर येथील मंडळींनी श्रीदासगणू महाराजांना विनंती केली आणि कसे कोणास ठाऊक पण श्रीमहाराजांनी होकार दिला.

श्रीदासगणू महाराजांचा होकार मिळविण्याच्या कामी पुण्यश्लोक अहिल्यानगरच्या मंडळींना किती कष्ट पडले असतील याची कल्पना अप्पांना आली. कारण ‘श्रीदासगणू महाराज – व्यक्ती आणि वाङ्मय’ या ग्रंथाच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी श्रीदासगणू महाराजांची परवानगी मागितली होती व त्यावेळी त्यांनाहि ही संमति मिळविण्यासाठी पुष्कळच प्रयत्न करावे लागले होते. श्रीदासगणू महाराज व्यक्ती म्हणून कसे आहेत आणि त्यांचे वाङ्मय कसे कल्याणकारी आहे हे लोकांपर्यंत पोहोचवावे याच हेतूने श्री अनंतरावांनी हा ग्रंथ लिहिला होता. त्याचे प्रकाशन समारंभपूर्वक करावे असे त्यांनी ठरविले व श्रीदासगणू महाराजांनी या समारंभास उपस्थित राहावे असे आग्रहाने विनविले. पुष्कळ आग्रह केला पण त्यांना यश आले नाही. त्यावेळी श्रीदासगणू महाराज म्हणाले, “हे बघ! माझ्याविषयी पुस्तक लिहिले हेच पुष्कळ झाले. आता मला या समारंभास नेवून बसवून माझे आणखी माकड करू नकोस.” यावर अप्पांनाहि अधिक काही बोलण्याचे धाडस झाले नाही. अप्पांना आपल्या तीर्थरूप आजोबांसाठी, आपल्या वंदनीय सद्गुरूंसाठी खूप काही करायचे होते, पण….

अशा स्थितीत पुण्यश्लोक अहिल्यानगरकरांना होकार मिळाल्यामुळे अप्पांना खूप आनंद झाला. सत्कारासाठी नगरपालिकेचे त्यावेळचे अध्यक्ष श्री.बार्शीकर, डॉ.निसळ, श्री.बागडे, श्री.दार्वेकर इत्यादी मंडळींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुंबई राज्याचे सहकारमंत्री श्री.त्र्यंबक शिवराम उर्फ बाळासाहेब भारदे आणि प्रमुख वक्ते म्हणून श्री.पु. ह. पटवर्धन या दोघांना आमंत्रित केले. दोघांनीहि मोठ्या आनंदाने या विनंतीचा स्वीकार केला. दि. ०३/१०/१९५८ रोजी हा सत्कार समारंभ व्हायचा होता.

तत्पूर्वी तीन दिवस श्रीदासगणू महाराजांच्या परंपरेतील कीर्तने व्हावीत व श्रीमहाराजांच्या काव्याचा आस्वाद जनतेला प्रत्यक्षपणे घेता यावा असे ठरविण्यात आले. त्याप्रमाणे अप्पांना कीर्तने करण्यासाठी विनंती करण्यात आली. त्यांनी अतिशय उत्सुकतेने व संतोषाने कीर्तने करण्याचे मान्य केले. जे व्हावे, जे घडावे, जे करावे असे अप्पांना फार दिवसांपासून वाटत होते, तो योग जुळून आला. तीन दिवस श्री अनंतरावांनी कीर्तने झाली. श्रीदासगणू महाराजांचे काव्य व त्यावर अप्पांची कीर्तने ! तीन दिवस पुण्यश्लोक अहिल्यानगरच्या आनंदाला उधाण आले होते. अप्पांनी श्रीदादांविषयीच्या आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

संतांच्या उपदेशे ज्यांनी प्राणपणाने बोधियले l

स्वतः आचरूनि जनसामान्या त्या मार्गाला वळवियले l

जोड कृतीची देऊन ज्ञाना उक्तीने प्रतिपादियले l

सन्मार्गाचे वासरमणि जे संत चरित्री गोवियले ll१ll

समाज उपदेशिला हितास्तव कळकळ अंतरि वाहुनिया l

सदाचरण अध्यात्म खरे ते सद्धर्माने आचरिल्या l

जीवन आपुले, उमजा तुम्ही, श्रद्धा भाव धरा हृदयी l

अभ्युदय, नि:श्रेयस दोन्ही साधून मोक्षपदा जाई ll२ll

ढोंगी, स्वार्थी, पुढारि, मठपति, बेगडि जे साधुसंत l

भोळ्या भाविकास फसविती साधाया तो निजस्वार्थ l

दंभस्फोटा करून त्यांच्या शब्दांचे मर्मी घाव l

सावध केले निर्भयतेने दासगणुंची ती माव ll३ll

मन आणि बुद्धि कुंठित होते पाहुनि त्या साहित्याला l

प्रासादिक त्या शब्दालागी परतत्वहि स्पर्शून गेला l

नवरस मिश्रित भक्तिरसाची गोडी भूवर अवतरली l

साहित्याच्या वर्तुळात परि दखल कुणी ना घेतियली ll४ll

नगरकरांनी आपुलकीचा भाव अंतरी धरूनिया l

योजियलेल्या दासगणुंच्या सत्काराला लक्षुनिया l

साहित्या या महाकवीच्या सर्वबाजुने निरखुनिया l

स्थान प्रतिष्ठेचे लाभो हीच आस माझ्या हृदया ll५ll

शुक्रवार, ३ आक्टोबर ! सत्कार समारंभास आरंभ झाला. प्रमुख वक्ते श्री. पु. ह. पटवर्धन बोलण्यास उभे राहिले. श्री.पटवर्धन श्री दासगणू महाराजांबद्दल म्हणाले, “ज्या काळात आजच्याप्रमाणे रेडिओ, वृत्तपत्रादि प्रचार साधने उपलब्ध नव्हती त्याकाळात हरिकथा, प्रवचनं इत्यादी करून लोकशिक्षणाचे, संस्कृति संवर्धनाचे महान कार्य श्री दासगणुंनी चाळीस वर्षांहून अधिक काळपर्यंत सातत्याने केले. श्री दासगणुंनी केलेले हे कार्य आम्हा पुढारी म्हणविणाऱ्या व्यक्तींनी केलेल्या कार्यापेक्षा दसपट महत्वाचे आहे. निरपेक्ष वृत्तीने व केवळ लोककल्याणाच्या भावनेने केलेले श्रीदासगणुंचे जे हे कार्य, त्यांचे ऋण केवळ शब्दाने वा अशा सत्कार समारंभांनी फिटने शक्य नाही.”

बहुजन समाजाच्या खालच्या थरापर्यंत शिक्षण पोचविणारे प्रसिद्ध कार्यकर्ते, रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर डॉ.भाऊराव पाटील हे आपल्या नियोजित कार्यक्रमात थोडा पालट करून या सत्कार समारंभास अगत्याने उपस्थित राहिले होते. त्यांनी श्री अनंतरावांच्या खांद्यावर हात ठेवला आणि भारावलेल्या अंत:करणाने ते म्हणाले, “चाळीस वर्षांपूर्वी सातारला मी महाराजांचे सेनान्हाव्याचे आख्यान ऐकले होते. त्यातील म्हशी भादरण्याचा प्रसंग आणि सेनाने घर जाळण्यास राजदूत आल्यानंतर निरनिराळ्या वृत्तीच्या लोकांनी केलेली भाषणे यांनी मी मोठा प्रभावित झालो होतो. महाराजांची भाविकता व ईश्वरनिष्ठा अतिशय प्रामाणिक आहे, या विषयी मला संदेह राहिला नाही. महाराजांचे एकच कीर्तन मी ऐकले होते. पण त्याचे स्मरण अजूनहि ताजे आहे. म्हणून मी या समारंभास मुद्दाम आलो.” आपल्या जाहीर भाषणात ते म्हणाले, “आपण हा दासगणुंचा सत्कार करीत नसून आपण आपलाच गौरव करून घेत आहोत.”

समारंभाचे अध्यक्ष सहकार मंत्री श्री. बाळासाहेब भारदे म्हणाले, “दुष्काळ आणि विपन्नदशा यांचे जणू माहेरच अशा पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्याने महाराष्ट्राला संपन्न करणारे साधुसंत दिले आहेत. सामान्य लोकांना व्याख्यानातून जे तत्वज्ञान कळत नाही ते आख्यानरूपाने कीर्तनकार पटवून देऊ शकतात. ते काम श्रीदासगणुंनी बजावले आहे. त्यांच्या आदर्शाप्रमाणे सदाचरणी होण्यात त्यांना खरा आनंद होणार आहे.”

या समारंभासाठी सर्व पटांगण माणसांनी फुलून गेले होते. पन्नास साठ व्यक्ति व संस्था यांचे वतीने श्री दासगणू महाराजांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. नगरपालिका व समस्त नागरिक यांच्या वतीने नगराध्यक्ष श्री. बार्शीकर यांनी पुष्पहार, शाल आणि श्रीफल अर्पण केले व मोठ्या रकमेची थैलीहि भेट म्हणून अर्पण केली. श्री दासगणू महाराजांनी ती थैली त्याक्षणीच नगरवाचनालयास देणगी म्हणून देऊन टाकली.

उत्तरादाखल श्रीदासगणू महाराज दोनच वाक्य बोलले. ते म्हणाले, “मी नगरचा आहे. नगरचा मला फार अभिमान वाटतो. नगरच्या लोकांनी माझे कौतुक न करता मला जोडे मारले असते तरी मी ते स्वीकारले असते.” “मी आयुष्यात कधी कुणाचा सत्कार स्वीकारला नाही, असाहि पुसटसा अहंकार मजजवळ राहू नये म्हणून अपवादास्तव मी हा पुरस्कार स्वीकारतो आहे.”

वाक्ये दोनच होती. वरवर चमत्कारिकहि होती. पण या उद्गारात श्रीदासगणू महाराजांचा सरळपणा, निरागसता, निरहंकार, विनय, जन्मभूमी नगर विषयी वाटणारे निरतिशय प्रेम, सत्कार समारंभाविषयीची अप्रीति, पुण्यश्लोक अहिल्यानगरच्या लोकांविषयीची आत्मियता आणि पुण्यश्लोक अहिल्यानगरच्या भूमीला शोभणारा फटकळपणा हे सारे होते.

वयाच्या ९० व्या वर्षी संतकवी श्रीदासगणू महाराजांच्या जीवनातला हा एकमेव सत्कार समारंभ ! तोहि त्यांची जन्मभूमी असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यानगरला झाला !!